मुंबई: बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ ओढवलेल्या शिवसेनेला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डिवचले आहे. बिहारमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. आपापल्या मतदारसंघात त्यांना एक टक्काही मते पडली नाहीत. मग आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा चमत्कार कुठे गेला, असा बोचरा सवाल विचारत सोमय्या यांनी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले. ( Kirit somaiya take a dig at Shivsena after Bihar Election 2020)
भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेने बिहारमध्ये 23 जागांवर उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेला ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हिरीरीने प्रचारही केला होता. मात्र, एकूण 23 जागांपैकी 21 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती.
Bihar me Chamatkar ki bat karnewali Shivsena ki Deposit gayab. 1% Votes bhi Nahi Mile. Where is Chamatkar Mr Uddhav Thackeray???
बिहार मधे शिवसेनेची डीपोझिट गुल. १% व्हॉट्स पण नाही. श्री उध्दव ठाकरे आणि श्री संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार? @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 10, 2020
साहजिकच शिवसेनेवर टीका करण्याची ही संधी भाजप सोडणार नाही, हे स्पष्ट होते. त्यानुसार आता किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर पहिला वार केला आहे. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून यावर काय प्रतिक्रिया देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी बिहारमधील मतमोजणीला सुरुवात झाली होती. मात्र, मतमोजणीच्या संथ गतीमुळे निकालाचे चित्र स्पष्ट होण्यास मध्यरात्रीपर्यंतचा वेळ लागला. दरम्यानच्या काळात भाजप्रणित एनडीए आणि तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळाली. ताज्या आकडेवारीनुसार ‘एनडीए’ने बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 125 जागांवर एनडीए तर 110 जागांवर महागठबंधनचे उमेदवार विजयी ठरले.
त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे 75 जागांवर विजय मिळवत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठीच्या बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने 74 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाची जागा घेतली. तर नितीशकुमारांचा संयुक्त जनता दलाने 43 जागांवर विजयाची नोंद केली. काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले.
संबंधित बातम्या:
Bihar Election: निवडणूक हारणे हाच फक्त पराभव नसतो, जुगाड करुन आकडा वाढवणे हा विजय नसतो: शिवसेना
शिवसेनेची मागणी मान्य, बिहार निवडणुकीसाठी सेनेचं चिन्ह ठरलं
मुख्यमंत्रिपदाच्या आशेने लंडनहून बिहारला, पुष्पम प्रिया दोन्ही मतदारसंघांत पिछाडीवर
( Kirit somaiya take a dig at Shivsena after Bihar Election 2020)