‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते ‘शिवसेनेची रणरागिणी’, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर

| Updated on: Mar 05, 2021 | 2:23 PM

अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण ते शिवसेनेची रणरागिणी... फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील खंदी कार्यकर्ती ते शिवसेनेच्या डॅशिंग आमदार... (shiv sena dashing women politicians neelam gorhe, know about her)

‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’ ते शिवसेनेची रणरागिणी, कोण आहेत नीलम गोऱ्हे?; वाचा सविस्तर
नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या
Follow us on

मुंबई: अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण ते शिवसेनेची रणरागिणी… फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील खंदी कार्यकर्ती ते शिवसेनेच्या डॅशिंग आमदार… अभ्यासू नेत्या आणि आक्रमक नेतृत्व अशी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची ही बहुआयामी ओळख आहे. शिवसेना नेते संजय राठोड यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर वनमंत्रीपदी नीलम गोऱ्हे यांची वनमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नीलमताई पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आपल्या समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (shiv sena dashing women politicians neelam gorhe, know about her)

कौटुंबीक पार्श्वभूमी

नीलम गोऱ्हे यांचं संपूर्ण नाव डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे असं आहे. त्यांनी पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएसएएमची पदवी घेतली आहे. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांना एक मुलगी आहे.

भारिपमधून निवडणूक लढवली

नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्यांनी भारिपमध्ये प्रवेश करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. दलित चळवळ बळकट करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते. भारिपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पुढे त्यांनी काही काळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतही काम केलं होतं.

शिवसेनेत प्रवेश

आक्रमक असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी काही काळ दलित चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजकीय महत्त्वकांक्षेतून त्यांनी हा राजकीय निर्णय घेतल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या आक्रमक नेतृत्व गुणामुळे त्यांनी शिवसेनेत स्वत:चे स्थान निर्माण केले. त्यांचा हा चढता राजकीय आलेख अनेक शिवसेना नेत्यांना आवडायचा नाही. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या. परंतु, नीलम गोऱ्हे या चांगल्या संघटक असल्याने बाळासाहेबांनी संघटना वाढवण्यासाठी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

राजकीय पदे

नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. विधानपरिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात त्यांनी काम केलं. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. तसेच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणूनही त्या सक्रिय होत्या.

पहिल्या महिला उपसभापती

त्यांनी 2002 ते 2008, 2008 ते 2014, 2004 ते आजपर्यंत विधानपरिषद सदस्या म्हणून कार्यरत आहेत. जून 2019मध्ये उपसभापतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र विधानमंडळात तब्बल ५५ वर्षानंतर विधानपरिषदेवर पहिल्या महिला उपसभापतीपदी बसण्याचा मान त्यांना मिळालेला आहे.

मंत्रिपदाची हुलकावणी

2014 मध्ये राज्यात युतीचं सरकार आलं. तेव्हा नीलम गोऱ्हे यांची मंत्रिपदी वर्णी लागेल असं बोललं जात होतं. मात्र, त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी देण्यात आली. 2014 मंत्रिमंडळात शिवसेनेने एकाही महिलेला मंत्रिपद दिलं नव्हतं. त्यानंतर 2019मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा शिवसेनेची सत्ता आली. त्यामुळे पुन्हा नीलम गोऱ्हे यांच्या नावाची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाची हुलकावणी मिळाली. आता राठोड यांच्या राजीनाम्यामुळे नीलमताईंच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली असून त्यांना हे पद मिळतं का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

संस्था

राजकारण्यात येण्यापूर्वी नीलमताई समाजकार्यात सक्रिय होत्या. त्यांनी स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेच्या त्या अध्यक्षा असून पुण्यात त्यांचं कार्यालय आहे. (shiv sena dashing women politicians neelam gorhe, know about her)

सामाजिक कार्य

नीलमताई यांचं सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्यावर ओझरता प्रकाश टाकला तरी त्याची प्रचिती येते.

 पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर 1000 च्यावर व्याख्याने दिली.
>> हुंडा, सामाजिक विषमता, महिला सक्षमीकरण, महिला संघटन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन.
>> लातूर – उस्मानाबाद व 2000मध्ये गुजरात येथील भूकंपग्रस्तांना तसेच, 19993मध्ये मुंबई येथील बॉम्बस्फोटातील कुटुंबियांना मदतकार्य
>> नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत मदत कार्य : – पूरग्रस्त तसेच 2006 साली मुंबई बॉम्बस्फोटानंतर नेपाळी कुटुंबियांना मदतकार्य
>> 1990 ते 1991मध्ये चित्रपट परीक्षण मंडळावर सदस्य म्हणून कार्य
>> 19993 ते 1994 मध्ये नाट्यपरीक्षण मंडळावर कार्य. : पथनाट्य लेखन, महिलाविषयक चित्रपट, नाटके यावरील समीक्षा : पाश्चात्य

>> नाट्यकृती व कविता गायन कार्यक्रमाचे आयोजन

> 1999 ते 2000 मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलं, महाराष्ट्र राज्याच्या 1994, 1998, 2001 व 2003 च्या महिला धोरण निर्मितीत सहभाग

> 1992 – 1993: सदस्या, भारतीय लोकविकास कार्यक्रम

> 1993 ते 1995: सदस्या – महाराष्ट्र राज्य महिला आयोग

> 1998: सदस्या, पर्यावरण संतुलन व संरक्षण समिती, भारत सरकार

> 1994 ते 1995: सदस्या, हुंडानिर्मुलन समिती व कायदा सहाय्य समिती

>> 1992 – 1998: यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या

विविध समित्यांवर उल्लेखनीय कार्य

नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषद सदस्या म्हणून राज्यातील विविध समित्यांवर काम केलं आहे. बीड येथील अवैध शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या प्रकरणाची चौकशी समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. महिला सबलीकरण समिती, पंचायत राज समिती, ग्रामीण विकास समितीसह अंदाज समिती, आश्वासन समिती, विशेष हक्क समिती, एड्स जनजागृती समिती, महिला सुरक्षेसाठीच्या आयटी समितीवरही त्यांनी काम केलं आहे. त्याशिवाय दलित, महिलांवरील अत्याचार, आदिवासी विकास, हुंडाबळी, अंधश्रद्धा निर्मूलन, दुर्बल, अपंग, निराधार महिला, मुस्लिम समाजाती तलाकसंबंधी प्रश्न आदी विविध सामाजिक विषयांवर त्यांनी काम केलं आहे. (shiv sena dashing women politicians neelam gorhe, know about her)

पुस्तकांचे लेखन

‘उरल्या कहाण्या’ हा कथासंग्रह व ‘नारीपर्व’, ‘माणूसपणाच्या वाटेवर’, ‘महिला आणि समाज’, ‘एक प्रवास संघर्षाचा’, ‘महाराष्ट्राच्या महिलांचा कायदेविषयक दर्जा’, ‘पीडीत महिलाओ की सहेली’, ‘आम्ही स्त्रिया’ या दिवाळी अंकांचे संपादन : ‘पोलीस मार्गदर्शक’, ‘स्त्रिया समान  भागीदार’, ‘कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा’, ‘वेध स्त्री प्रश्नांचा’, ‘विधानपरिषद माझे कामकाज’ – माझा सहभाग – कालखंड; सन 2002 ते 2007, विधानपरिषद माझे कामकाज’ – कायदा –सुव्यवस्था या विषयावरच्या कामकाज विषयांवर; सन 2002 ते 2013, विधानपरिषद माझे कामकाज’ – माझा सहभाग – कालखंड; सन 2007 ते 2013, ‘शिवसेनेतील माझी 20 वर्ष’ इ. पुस्तकांचे लेखन त्यांनी लेखन केलं आहे. ‘महिला मंडळ मार्गदर्शक’, ‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’, ‘पंचायत राज मार्गदर्शक’, ‘महिला विकासाची एकाकी वाटचाल’, ‘महिला विकासाची जागतिक कृती रूपरेषा’, ‘ स्त्री आरोग्याची कुळकथा’, ‘स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग’, ‘स्त्रिया व कायदा’, ‘आरोग्यातून विकासाकडे’, ‘शरीराची ओळख’, ‘महिला संबंधी धोरण (1994) : स्वयंसिद्धतेकडे वाटचाल’,  ‘नव्या शतकासाठी महिला धोरणे व अंमलबजावणी’ आणि ‘भिंतीमागचा आक्रोश’ या पुस्तकांचे त्यांनी संपादन केलं आहे.

परदेश दौरे

त्यांनी 1990 मध्ये स्वीडन व 2000 मध्ये ऑस्ट्रिया येथील संशोधन संस्थात प्रबंधाचे वाचन केले. 1996 ते 2001, 2007 ते 2010, 2015 ते 2018 न्यूयॉर्क येथील जागतिक महिला आयोगाच्या चर्चासत्रात 16वर्षे सहभाग घेतला. 1995 बीजिंग येथील चौथ्या विश्व महिला संमेलनात सहभाग घेतला. बँकॉक येथील महिला विकास परिषदेत सहभाग : नेपाळ, बांगलादेशचा अभ्यास दौरा केला. त्याशिवाय महाराष्ट्र विधीमंडळाच्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, चीन, स्वीडन, रशिया, इंग्लड, फिनलंड, स्विट्झर्लंड, डेन्मार्क संसदीय अभ्यास दौऱ्यात सहभागही घेतला होता. (shiv sena dashing women politicians neelam gorhe, know about her)

 

संबंधित बातम्या:

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

‘पोपटा’चं गाणं सर्वात आधी कुणी गायलं?; आनंद शिंदेंकडे ते कसं आलं?; वाचा आनंद शिंदेंना स्टार बनविणाऱ्या गाण्याचा किस्सा!

ठाकरे कुटुंबीयांसोबत जमीन खरेदीत भागिदारी?; कोण आहेत रवींद्र वायकर वाचा सविस्तर!

प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

डोक्यात पंप हाणू म्हणणाऱ्या आमदार राम सातपुतेंवर स्पेशल रिपोर्ट; वाचा सविस्तर!

(shiv sena dashing women politicians neelam gorhe, know about her)