मुंबई : दसरा मेळाव्यासाठी (Dussehra Melava) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) कुणालाच परवानगी न घेण्याची भूमिका आता मुंबई महानगर पालिकेनं (BMC 2022) घेतलीय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्याचं पालिकेनं दसरा मेळाव्याची परवानगी नाकारताना म्हटलंय. त्यामुळे कुणालाच परवानही देणार नाही, अशी बचावात्मक भूमिका बीएमसीने घेतलीय. शिवसेना आणि शिंदे गटाची मागणी अखेर बीएमसीने फेटाळून लावली आहे. उपायुक्त परिमंडळ दोन कडून ठाकरे गट आणि शिंदे गट यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रातून परवानगी देण्यात येणार नाही, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायाचा हवाला या पत्रात देण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या अभिप्रायावरुन परवानगी नाकारल्यानं पालिकेनं म्हटलंय.
शिवाजी पार्क परिसरात दोन गटात झालेल्या राड्यामुळे शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाय शिंदे गटालाही परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आता शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचंय.
शिवसेनेचं शिष्टमंडळ पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्येही दोन दिवसांपूर्वी गेलं होतं. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. दरम्यान, बुधवारपर्यंत कोणताही निर्णय न घेण्यात आल्यानं अखेर कायदेशीर मदत घेण्याचं शिवसेनेनं ठरवलं. त्यामुळे शिवसेनेच्या अनिल देसाई यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.
अनिल देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडेल. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, यावरुन राजकारण ढवळून निघालंय. त्यातच आता पालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर हायकोर्ट नेमका काय निर्णय देत, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.