मुंबई : कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे. मुंबईला तिसऱ्या लाटेटा कसलाही धोका नाही, असं कालचमुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासंबंधी हालचाली वाढल्या आहेत.
दसरा मेळाव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे. सध्या यासंबंधी चर्चा सुरु, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील”
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेचा पहिलाच दसरा मेळावा गतवर्षी पार पडला. परंतु या मेळाव्यावर कोरोनाचं सावट होतं. याचमुळे शिवतीर्थावरची भव्य सभा टाळून सेनेचे मोजके नेते, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. शिवसैनिकांसाठी हा मेळावा ऑनलाईन देखील दाखविण्यात आला. याच मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला सारुन उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण करताना भाजपवर आसूड ओढले.
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उरलेला नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. महानगरपालिकेने उच्च न्यायालयात तशी माहिती दिली. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या 2586 नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 3942 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
याशिवाय, शहरातील 42 लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 82 लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे पालिकेने न्यायालयात सांगितले.
हे ही वाचा :
लोकशाहीसंदर्भात जो आवाज उठवतो, त्याची नाकेबंदी केली जातेय, संजय राऊत कडाडले