रवी लव्हेकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर: शिवसेना (shiv sena) आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं (dussehra rally) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. उद्या संध्याकाळी दोन्ही गटाच्या तोफा धडाडणार आहेत. पण त्यापूर्वीच दोन्ही गटाच्या नेत्यांकडून फटाके फोडण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विशेष म्हणजे दसरा मेळाव्यावरूनच या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीका होत आहे. तसेच आमचाच दसरा मेळावा मोठा होणार. आम्हीच खरी शिवसेना आहोत. दुसरी शिवसेना खोटी आणि बनावट असल्याची टीकाही केली जात आहे. शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी तर ठाकरेंचा मेळावा हा राष्ट्रवादीला आंदण दिल्याचा दावाच केला आहे. त्यामुळे आता शहाजीबापूंच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. शिवतिर्थावर होणारा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा राष्ट्रवादीला आंदण दिला आहे, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसीवरील दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून 30 ते 35 हजार शिवसैनिक जाणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीला आंदण दिला आहे, असं शहाजी बापूंनी म्हटलंय.
उद्या होणाऱ्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात शिवसैनिकांपेक्षा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी असणार आहे. तर बीकेसीवर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे आमचा मेळावा रेकॉर्ड ब्रेक होईल, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, दादर शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण सभा मंडप भगवामय करण्यात आला आहे. शिवसैनिकांना बसण्यासाठी शिवाजी पार्कात खुर्च्या लावण्यात येत आहेत. व्हीआयपी एन्ट्री व प्रसिद्धी माध्यमांकरिता स्टेज देखील तयार करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे दसरा मेळाव्याचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे.