मुंबई: शिवसेनेविरोधात (shivsena) बंड करून शिंदे गटात सामिल झालेल्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शीतल म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवेसनेविरोधात बंड केलं होतं. शिंदेंच्या या बंडात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमधील नगरसेवक सामील झाले होते. मुंबईतून एकही नगरसेवक शिंदे गटात गेला नव्हता. शीतल म्हात्रे यांनी बंड केल्याने त्या शिंदे गटात जाणाऱ्या मुंबईतील पहिल्याच नगरसेविका ठरल्या आहेत. आठ दिवसांपूर्वीच शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाविरोधात आगपाखड केली होती. शिंदे गटाला धडा शिकवण्याचं जाहीर वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्याच स्वत: शिंदे गटात सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विभाग क्रमांक 1 मधील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे.
शीतल म्हात्रे यांनी कालच शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणाही दिल्या. शिंदे साहेब हेच आपले नेते असल्याच्या भावानाही यावेळी व्यक्त करतानाच शिवसेनेत घुसमट होत असल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.
शीतल म्हात्रे यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवसेनेत गळचेपी होत असल्यानेच आपण हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. शिंदे यांनी बंड केलं तेव्हा मी सुद्धा जे सर्व सामान्य शिवसैनिक करतो त्या पद्धतीने वागले. आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. हे का आणि कसं झालं? असं मलाही वाटलं. त्यामुळे मीही शिंदे गटावर टीका केली. पण जेव्हा मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, त्यांनी मांडलेली भूमिका ऐकली तेव्हा हेच तर आमचंही दुखणं आहे असं वाटलं. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जावं हे प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं. महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची खूप मोठ्या प्रमाणात गळचेपी होतेय. काही मूठभर लोकांच्या हातात पालिकेतील सेना होती. याबाबत मातोश्रीला सांगण्याचा प्रयत्न केला. पण वरिष्ठांनी आमची भूमिका पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवलीच नाही. मी आज जे काही बोलतेय ती माझी एकटीची नाही तर शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाची वेदना आहे, असा दावाही त्यांनी केला.