मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि शिवसेना नेते सुहास कांदे यांच्या मतदानाला भाजपने आक्षेप घेतला आहे. भाजपने (bjp) थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभेची मतमोजणी (Rajya Sabha Election) लांबली आहे. संध्याकाळी 5 वाजता सुरू होणारी मतमोजणी 8 वाजले तरी सुरू झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ट्विट करत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. ईडीचा डाव फसल्याने आता रडीचा डाव सुरू झाला आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. राऊत यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदानाची व्हिडीओ फुटेज मागितले आहेत. ते पाहून आयोग यावर निर्णय देणार आहे. तोपर्यंत निवडणुकीची मतमोजणी बंद राहणार आहे.
राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे?
ईडी चा डाव फसला!
आता रडीचा डाव सुरू झाला!!
आम्हीच जिंकू!
जय महाराष्ट्र!!@BJP4Maharashtra@CMOMaharashtra— Sanjay Raut (@rautsanjay61) June 10, 2022
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपविरोधात संताप व्यक्त केला आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू!, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर हे मतदानासाठी आले होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मतपत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली. यशोमती ठाकूर यांनी त्यांची मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. तर सुहास कांदे यांनी दोन पोलिंग एजंटला मतपत्रिका दाखवली, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे पोलिंग एजंट पराग अळवणी आणि अतुल सावे यांनी आव्हाड, कांदे आणि ठाकूर यांच्या या कृतीला आक्षेप घेतला. त्यांनी रिटर्निंग ऑफिसरकडे लेखी तक्रारही केली. त्यानंतर भाजपचे नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आयोगाने मतदानावेळचं व्हिडिओ फुटेज मागितलं आहे. ते पाहूनच निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. त्यामुळे मतमोजणी तूर्तास थांबवण्यात आली आहे.
भाजपने आघाडीच्या मतदानावर आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसनेही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. भाजपचे नेते सुधीर मुनंगटीवार यांनी आशिष शेलार यांच्या हातात मतपत्रिका दिली. तर अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे हनुमान चालिसाचं पुस्तक होतं. त्यामुळे राणा यांनी हिंदू मते प्रभावित केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.