मुंबईः अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात शामिल होण्याचा निर्णय जालन्याचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी घेतलाय. हे जाहीर करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. मात्र खोतकरांचे अश्रू खरे की मगरमच्छ के आसू आहेत, असा सवाल शिवसेना नेते आणि जालना जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे जे सुरुवातीपासूनचे प्रयत्न सुरु होते, त्यात अर्जुन खोतकर सहभागी होते. मात्र आताच ते भावनिक झाल्याचं दाखवत आहेत, असा गंभीर आरोप घोसाळकर यांनी केला. विशेष म्हणजे आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर यांनी संजय राऊत, विनोद घोसाळकरांसह उद्धव ठाकरे यांच्याशीदेखील बोललो असल्याचं सांगितलं. त्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं. मात्र शिवसेने नेते घोसाळकर यांनी त्यांच्यावरच आता आरोप केले आहेत.
अर्जुन खोतकरांवर टीका करताना विनोद घोसाळकर म्हणाले, ‘ उद्धवजी ठाकरे आणि शिवसैनिकांनी खोतकारांना मोठे केले आहे. दोन ते तीन वेळा ते आमदार राहिलेले आहे तसेच शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी राज्यमंत्रीपद दिले आणि उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रीपद दिले होते. जे एकनाथचे प्रयत्न चाललेले होते त्यातला एक भाग हा अजून खोतकर होताच. पहिल्यापासून होता. आता मात्र ते तसे दाखवतायेत. सकाळी अर्जुन खोतकरचा मला फोन आला होता. मागील 40 वर्षापासून तो माझा मित्रही आहे. त्याला घेऊनच मी काम करत होतो. त्यामुळे माझा मित्र म्हणून कुटुंबातला एक माणूस म्हणून मला असं वाटलं की त्याला बोलावं. खोतकर मला म्हणाला माझ्या कुटुंबावर आलेलं जे काही संकट आहे त्यामुळे मी अस्वस्थ आहे….
ईडीच्या कारवाईमुळे तणावाखाली हा निर्णय घेत असल्याचं खोतकर दाखवत आहेत. मात्र त्यांना पलट सवाल करत विनोद घोसाळकर म्हणाले, ‘मुळात यांना त्रास दिला कोणी तर ईडीने म्हणजे भारतीय जनता पक्षाने.. त्यांना हा शरण जातोय. खोतकर हा मिरवतो की मी मराठ्यांचा नेता आहे. मावळा आहे मग अशी शरण जाणे त्याला शोभतं का? त्याने लढायला हवं होतं. आम्ही त्याच्या पाठीशी होतो. बाळासाहेबांच्या एका शब्दावरती संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठायचा. हे संकट तर खूप छोटं आहे. एकनाथ शिंदेचा गट हे एकच आमच्यासमोरील आव्हान नाहीये. अशी आव्हानं आम्ही खूप पाहिलेली आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले बगल बच्चे…
संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तारांवर टीका करताना विनोद घोसाळकर म्हणाले, ‘ – आमच्या मराठवाडा कार्यक्षेत्रातले भुमरे सत्तार दोघे मंत्री असताना गेले. यांनी जाण्याचे कारण काय?
मात्र हे दोघे आमिषाला बळी पडले आणि गेले. तर ते जात असताना त्यांना विसर पडलाय की आपण शिवसेनेचा नव्हे तर महाराष्ट्राचा विश्वासघात केला.