मुंबई : ‘बॉम्बे’चं नामकरण ‘मुंबई’ होऊन दोन दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘बॉम्बे’च म्हटल्याचे समोर आलंय. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी त्यांच्या खात्याच्या डायरीमध्ये ‘मुंबई’चं नाव ‘बॉम्बे’ असं केलंय. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ही बाब समोर आणली आणि मंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीकाही केली.
सुभाष देसाईंच्या खात्याचा नेमका प्रताप काय?
शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहे. उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण म्हणजेच एमआयडीसीने डायरी छापली आहे. या डायरीत महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रांची माहिती देणारा एक नकाशाही छापण्यात आला आहे. या नकाशात ‘मुंबई’ शहराचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करण्यात आला आहे.
धनंजय मुंडेंनी काय म्हटलं आहे?
“बॉम्बेचे नाव अधिकृत मुंबई झालेले शिवसेनेला माहीत नाही का? की शिवसेनेचा मराठीचा कळवळा फक्त दाखवण्यापुरताच आहे. कारण सेनेच्या ताब्यात असलेल्या उद्योग खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या MIDC च्या डायरीतच मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ करण्यात आला आहे.”, असे राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
बॉम्बेचे नाव अधिकृत मुंबई झालेले शिवसेनेला माहीत नाही का? की शिवसेनेचा मराठीचा कळवळा फक्त दाखवण्यापुरताच आहे. कारण सेनेच्या ताब्यात असलेल्या उद्योग खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या MIDC च्या डायरीतच मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ करण्यात आला आहे. @ShivSena @uddhavthackeray @Subhash_Desai pic.twitter.com/590nQyBj8z
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 22, 2019
शिवसेना आणि मुंबई
मुंबई आणि शिवसेना हे नातं सर्वश्रुत आहे. मुंबई म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मुंबईतल्या प्रशासनावर म्हणजेच मुंबई महापालिकेवरही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. एवढंच नव्हे, तर ‘बॉम्बे’चं नामकरणही शिवसेनेच्या सत्ताकाळातच झालं. म्हणजे 1995 साली ‘बॉम्बे’चं ‘मुंबई’ करण्यात आलं
राजकारणासाठी कायम मुंबईचा वापर करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्यक्षात ‘मुंबई’ शब्दाचं वावडं का, असा प्रश्नही आता विचारला जातो आहे.