मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. त्यांच्यासोबत 51 आमदारांनीही बंड केलं आहे. त्यातील 8 मंत्री शिंदे गटाकडे आहेत. मात्र, हे सर्व मंत्री गेल्या आठ दिवसांपासून गुवाहाटीत थांबले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) या आठही मंत्र्यांची खाती इतर चार मंत्र्यांकडे सोपवली आहेत. राज्यातील जनतेचा खोळंबा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. तसेच पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणूनही हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर मंत्र्यांची खाती काढली आहेत. पण त्यांचं मंत्रिपद कायम ठेवलं आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनीही खाती काढली याचा अर्थ मंत्रिमंडळातून काढलं असं होत नाही, असं स्पष्ट केलं आहे. कायदेशीर पेचप्रसंगात अडकू नये. शिंदे यांच्या बंडाला बळ मिळू नये म्हणूनच ठाकरे सरकारने ही चतुराई केल्याचं सांगितलं जात आहे.
आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे एकूण 14 मंत्री आहेत. त्यात शिवसेनेचे चार मंत्री आहेत. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सुभाष देसाई, अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे. या सर्वांना इतर मंत्र्यांच्या खात्याचा प्रभार सोपवण्यात आला आहे.
नियम सहानुसार राज्यातील मंत्रिमंडळातील फेरबदलाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. एखादा सदस्य आजारी असेल किंवा त्याचं खातं सांभाळण्यात अपयशी असेल तर त्यांची खाती बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने प्रत्येक पाऊल जपून टाकण्यास सुरुवात केली आहे. कोणतीही चूक शिंदे गटाच्या पथ्यावर पडू नये यासाठी शिंदे हे सावधानतेची खबरादारी घेत आहेत. शिंदे यांना मंत्रिमंडळातून काढले तर त्यांच्या बंडाला बळ मिळेल. आमच्यावर पक्षानेच कारवाई केली आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत, असं शिंदे गटाकडून सांगितलं जाऊ शकतं. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. मंत्री राज्यात नाही म्हणूनच त्यांची खाती बदलण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.
शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली असती तर शिंदे गट नाराज झाला असता. त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असते. त्यामुळे आमदारांचे परतीचे दोर कापले गेले असते. त्यामुळेच केवळ खाती बदलण्याचा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे. शिवाय जनतेतही त्यामुळे सकारात्मक मेसेज देण्याचा त्यामागचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे.