मुंबईः शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगल्यास आयुष्य सार्थकी लागतं, या उक्तीचा दाखला देत शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी नितीश कुमारांचं (Nitish kumar) कौतुक केलं. बिहारच्या राजकीय हालचालींवर भाष्य करताना अंबादास दानवे म्हणाले, भाजपाच्या दबावापुढे न झुकता एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा अत्यंत स्वाभिमानाचा निर्णय आहे. भाजपाच्या या दमननीतीचा एक दिवस भारतात विस्फोट होईल, असा इशारादेखील अंबादास दानवे यांनी दिला. औरंगाबाद येथील विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांना महाराष्ट्र सरकारमध्ये विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने त्यांच्या नावाची शिफारस विधान परिषद उपाध्यक्षांसमोर केली आहे. तत्पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून दानवेंनी जोरदार टीका केली.
बिहारमधील राजकीय स्थित्यंतरानंतर अंबादास दानवे यांनी नितीश कुमारांचं कौतुक केलं. ते म्हणाले, आपल्या भागातील एका दैनिकाचं छान ब्रीदवाक्य आहे. शेळी म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा, सिंह म्हणून एक दिवस जगणं सार्थकी लागतं.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वाटत असेल, की आपण शेळी म्हणून जगत आहोत, तर त्यांनी एक दिवस सिंह म्हणून जगण्याचा स्वाभिमानाचा निर्णय घेतला असावा… तो योग्यच आहे, असं वक्तव्य दानवेंनी केलंय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. यावेळी टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने अब्दुल सत्तारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता फार कमी होती. मात्र ऐनवेळी नावं घोषित झाली, त्यावेळी सत्तारांचाही नंबर लागला. अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना अल्पसंख्याक मंत्री पद देण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या आमदारांना मंत्रिपद कसं दिलं गेलं. यावरून विरोधकांकडून टीका होतेय. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनीही मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. सत्तार यांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव असल्याचंच यातून स्पष्ट होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची शक्ती जास्त की अब्दुल सत्तार यांची, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं दानवेंनी म्हटलंय..
महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर राज्यांमध्ये भाजपची दमननीती सुरु आहे, मात्र या धोरणाचा एक दिवस हिंदुस्थानात मोठा विस्फोट होणार असल्याची जहरी टीका अंबादास दानवे यांनी केली. बिहारमधील भाजप नेते सुशील कुमार मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्रातील शिवसेना फोडण्यात भाजपाचाच हात होता, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार मोदी यांनी केलाय.