चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार काँग्रेसच्या वाटेवर आहेत. चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आमदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास, विदर्भात शिवसेनेला मोठा फटका बसेल. धानोरकर यांचा संभाव्य काँग्रेसप्रवेश म्हणजे शिवसेना आणि भाजप युतीचे ‘साईड इफेक्ट्स’ असल्याची चर्चा आहे.
आमदार बाळू धानोरकर हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवाय, ते काँग्रेसमधून चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही विदर्भातील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे आपला आमदार पक्ष सोडत असल्याचा शिवसेनेला फटका आणि धानोरकरांनी लोकसभा लढवल्यास युतीला फटका, असा दुहेरी फटका आमदार बाळू धानोरकरांनी सेना सोडल्यास बसणार आहे.
विशेष म्हणजे, आमदार बाळू धानोरकर हे शिवसेना आणि भाजप युतीमुळे नाराज असल्याची चर्चा आहे. आधी स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती केली. या युतीमुळे शिवसेनेच्या गोटात नाराजांची मोठी फौज निर्माण झाल्याची चर्चा आहे.
कोण आहेत बाळू धानोरकर?
बाळू धानोरकर हे शिवसेनेचे चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. सुरेश नारायण धानोरकर असे त्यांचे पूर्ण नाव असून, बाळूभाऊ धानोरकर या नावाने ते मतदारसंघात आणि चंद्रपूर जिल्ह्यात परिचित आहेत. 2009 सालीही बाळू धानोरकर वरोऱ्यातून आमदारकीला उभे होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या संजय देवतळेंनी त्यांचा परभाव केला होता. मात्र, 2014 च्या निवडणुकीत बाळू धानोरकर विजयी होत विधानसभेत गेले.