विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज नियमित सुनावणी पार पडली. सुनावणीच्या पहिल्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पाठवलेल्या पत्राच्या मुद्द्यावरुन सवाल-जवाब करण्यात आले. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीतदेखील सुनील प्रभू यांची फेरचाचणी घेण्यात आली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. यावेळी काही प्रश्नांचे उत्तरे देताना सुनील प्रभू अडखळले. काही प्रश्नांवर उत्तर देताना आपल्याला नीट लक्षात नाही, असं उत्तर सुनील प्रभू यांनी दिलं.
सुनील प्रभू यांनी प्रतिज्ञापत्रात 50 व्या परिच्छेदात एक पत्र जोडलं आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय. याचबाबत वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांनी प्रश्न विचारले. हे पत्र तुम्हीच लिहिलं का, ते पत्र इंग्रजीतच का लिहिलं, त्यावर तुमचीच सही आहे का? असे अनेक प्रश्न महेश जेठमलानी यांनी विचारले. संबंधित पत्र एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी यावेळी केला. त्यावर सुनील प्रभू यांनी हे सर्व खोटं आहे, असं म्हटलं.
वकील महेश जेठमलानी : दिलीप लांडे यांची सही ही अनुक्रमांक 32 समोर आहे का?
सुनील प्रभू : 32 समोर सही केली आहे.
विधानसभा अध्यक्ष : तुम्ही स्पष्ट उत्तर द्या. तिथ सही आहे, मात्र ती लांडेचीच आहे का? असा त्यांचा प्रश्न आहे.
सुनील प्रभू : त्यांच्या नावासमोर सही आहे ती त्यांचीच असणार ना?
जेठमलानी : प्रतिज्ञापत्रात 50 व्या परिच्छेदात जे पत्र तुम्ही जोडले आहे त्यावर तुमचीच सही आहे का?
प्रभू : होय
जेठमलानी : हे पत्र तुम्ही एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलं आहे का? आणि त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत समजावून सांगितला आहे का?
प्रभू : होय. हे पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून आहे. त्याचा मजकूर मला मराठीत समजावून सांगण्यात आला आहे.
जेठमलानी : आपण कथित पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे मग हे इंग्रजीत का लिहिले गेले?
प्रभू : भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून पत्र इंग्रजीत लिहिले आहे.
जेठमलानी : मराठीत लिहिलेले पत्र कायदेशीर प्रयोजनासाठी वापरता येणार नाही का?
प्रभू : नाही, हे म्हणणे चुकीचे आहे.
प्रभू : मला असं वाटलं म्हणून मी लिहिलं. कदाचित त्यावेळी मला ज्ञान नव्हतं. आता मला हे पाहिल्यावर कळलं की मराठी देखील चालतं.
जेठमलानी : जेव्हा आपल्या कोणत्याही पत्रा संदर्भात कायदेशीर बाबी उद्भवतील असे वाटते तेव्हा आपण इंग्रजी भाषेत पत्र लिहिता,असं म्हणणे योग्य आहे का?
प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : आपल्याला या पत्रासंदर्भात असे का वाटले की कायदेशीर पेच उद्भवू शकतो?
प्रभू : त्यावेळी राजकीय पेच असा निर्माण झाला होता की वाटले की भविष्यात कायदेशीर पेच उद्भवू शकतो.
जेठमलानी : आपल्याला या पत्राबाबत असे का वाटलं की कायदेशीर पेच उद्भवू शकतो?
प्रभू : त्यावेळी राजकीय पेच आणि संभ्रम निर्माण झाला होता. त्यातून कायदेशीर पेच भविष्यात निर्माण होतील असे मला वाटले.
जेठमलानी : यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया उद्धवू शकते, असे 22 जून 2022 रोजी प्रथमच आपल्याला वाटले का?
प्रभू : यापूर्वी विधीमंडळात असे पेच निर्माण झाले त्यावेळी ते पेच न्यायालयात गेले आणि दाद मागितली गेली. हा पूर्व इतिहास होता म्हणून मला हे वाटले, बरोबर आहे.
जेठमलानी : इंग्रजीत लिहिलेले हे एकमेव पत्र आहे का?
प्रभू : नाही
जेठमलानी : या पत्रातील भाषा तुमची स्वतः ची आहे का?
प्रभू : मला त्यावेळी जे आकलन झाले ते मी लिहिले.
जेठमलानी : या पत्रात वापरलेली भाषा आपली स्वतःची आहे का?
प्रभू : मराठीत जे आकलन झाले, जे मला वाटलं लिहावेसे, ते मी इंग्रजीत भाषांतर करून लिहिले.
जेठमलानी : आपण हे पत्र मराठीत कुणाला सांगितले का?
प्रभू : मला आठवत नाही ते
जेठमलानी : या पत्राचा मराठी मसुदा आपल्याकडे आहे का?
प्रभू : आता नाही.
जेठमलानी : आपण मेल केला होता, तेव्हा मराठी मसुदा तयार केला होता का?
प्रभू : मला आता आठवत नाही.
जेठमलानी : या पत्राच्या अगोदर किंवा नंतर आपण कधी एकनाथ शिंदे यांना इंग्रजीत पत्र लिहिले आहे का?
प्रभू : होय लिहिलंय.
जेठमलानी : आपण एकनाथ शिंदे यांना 21 ते 30 जूनमध्ये इंग्रजीत पत्र लिहिल का?
प्रभू : होय
जेठमलानी : हे सोडून इतर कुठलं लिहिलं का?
प्रभू : होय लिहिलंय
जेठमलानी : आता ते आपण आता सादर करू शकता का?
प्रभू : रेकॉर्डवर आहे
जेठमलानी : 22 जून 2022 चे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले?
प्रभू : व्हॉट्सअपच्या माध्यमातून.
जेठमलानी : आपण आता यावेळी वाट्सअप मेसेज सादर करू शकता का?
प्रभू : आता नाही करू शकत.
जेठमलानी : उद्या सादर करु शकता का?
प्रभू : आता मी नेमकं सांगू शकत नाही. बघतो. मी प्रयत्न करतो.
जेठमलानी : आपण हा व्हॉट्सअप संदेश आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला आहे का?
प्रभू : मला नेमकं आठवत नाही. मी हा मेसेज माझ्या मोबाईलवरून पाठवला की कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरून म्हणून म्हटलं प्रयत्न करतो.
जेठमलानी : आपण या पत्राची एक प्रत सादर केली आहे.. वाट्स अपवर पाठवलेली प्रत ही मुळ प्रत आहे असे समजायचे का?
प्रभू : नाही
जेठमलानी : पत्राची मूळ प्रत कुठे आहे
प्रभू : ओरिजिनल प्रत रेकॉर्डवर आहे
जेठमलानी : एकनाथ शिंदे यांना अशी कोणतीही मूळ प्रत पाठवण्यात आलेली नाही, असे मी आपल्याला सांगतो
प्रभू : हे खरं नाही