‘तुम्ही ज्युनिअर आहात मधेमधे बोलू नका’, शिंदे गटाचे वकील ठाकरे गटाच्या वकिलांवर चिडले, दोघांमध्ये ‘तू तू मैं मैं’

| Updated on: Nov 23, 2023 | 5:32 PM

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकणावर आजदेखील नियमित सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्याचं काम झालं. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी जेठमलानी यांनी देवदत्त कामत यांना तुम्ही ज्युनिअर आहात, मधेमधे बोलू नका, असं संतापात म्हटलं.

तुम्ही ज्युनिअर आहात मधेमधे बोलू नका, शिंदे गटाचे वकील ठाकरे गटाच्या वकिलांवर चिडले, दोघांमध्ये तू तू मैं मैं
Follow us on

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज नियमित सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची आज फेरसाक्ष नोंदवण्यात आली. यावेळी व्हीपच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना अनेक प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. जे आमदार संपर्कात नव्हते त्यांना व्हीप कसे पाठवले? असा सवाल जेठमलानी यांनी केला. त्यावर सुनील प्रभू यांनी कार्यालयातील कर्मचारी मनोज चौगुले यांनी व्हाट्सअॅपच्या माध्यमातून आमदारांना व्हीप पाठवल्याचं सांगितलं. पण जेठमलानी यांनी त्याबाबतचे कागदपत्रे किंवा पुरावे सादर केले नसल्याचा आरोप केला. तसेच हे चुकीचं आहे, असं जेठमलानी म्हणाले. त्यावर सुनील प्रभू यांनी हे खोटं आहे, असं म्हटलं.

महेश जेठमलानी यांनी आक्षेप घेतलेल्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत बोलू लागले. त्यावर महेश जेठमलानी संतापले. तुम्ही ज्युनिअर आहात मधेमधे बोलू नका, असं म्हणत महेश जेठमलानी देवदत्त कामत यांच्यावर चिडले. मी माझे प्रश्न विचारत आहे, असंही जेठमलानी यावेळी म्हणाले. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये ‘तू तू मैं मैं’ झालं. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या वकिलांना शांत होण्याचा सल्ला दिला. त्यांनी दोन्ही वकिलांना समज दिली. “तुमच्या वादाचा परिणाम वेळकाढूपणामध्ये होत आहे. हे मी रेकॉर्ड मध्ये नोंद करतोय. मला ठराविक वेळेत हे प्रकरण निकाली काढायचे आहे”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

सवाल-जवाब नेमके काय झाले?

जेठमलानी – आमदार निवास म्हणजे काय?

प्रभू – एमएलए हॉस्टेल

(शिंदे गटाचे वकील मला कन्फयुज करण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रभूंचा आक्षेप. दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु, अध्यक्षांनी हे थांबवलं)

जेठमलानी – तुम्ही पार्टी ऑफिसला व्हीप दिले. उरलेल्या आमदारांना तुम्ही आमदार निवासात व्हीप दिला का?

प्रभू – मी काहींना पार्टी कार्यालयात दिला, काहींना आमदार निवासात दिला, काही जिथे कुठे असतील तिथं दिले.

विधानसभा अध्यक्ष – जेवढे कमी शब्दात उत्तर द्याल तेवढे कमी उप प्रश्न निर्माण होतील

प्रभू – मी नेहमीच आपले ऐकतो

विधानसभा अध्यक्ष – मी ते सभागृहात अनुभवले आहे

(विधानसभा अध्यक्ष आणि प्रभूंमध्ये मिश्किल टिप्पणी)

जेठमलानी – आमदार निवासात होते त्यांना व्हीप देण्यात आला. पुढे म्हटलं आहे, देण्याचा प्रयत्न झाला म्हणजे नेमकं काय, दिला की नाही?

प्रभू – भाषा अशी आहे की तुम्ही समजून घ्याल तसा अर्थ निघतो. माझ्यासोबत पार्टी ऑफिसला होते त्यांना तिथं दिलं. जे बाहेर होते तिथे देण्याचा प्रयत्न केला

जेठमलानी – आमदार निवासातील किती आमदारांना व्हीप दिला होता?

प्रभू – कितींना दिला हे आठवत नाही. पण जिथे होते, दिला होता, हे आठवत आहे.

जेठमलानी – तुम्ही व्हीप दिला हे कशावरून त्यांना पोचला

प्रभू – व्हीप दिल्यावर त्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत

प्रभू – ज्यांना व्हीप दिला त्यांच्या सह्या घेतल्या आहेत. आमच्या कार्यालयात सर्व पुरावे आहेत.

जेठमलानी – जे आमदार संपर्कात नव्हते त्यांना व्हाटसपने व्हीप पाठवला गेला का?

प्रभू – सर्व लोकांना धावपळीत व्हाट्सअॅप पाठवणं शक्य नव्हतं. पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत व्हाटसअॅपने किंवा प्रत्यक्ष व्हीप दिला जातो. हे व्हीप कार्यालयीन कर्मचारी यांच्यामार्फत मनोज चौगुले याच्या मार्फत पाठवले.

जेठमलानी – 37 व्या प्रश्नाच्या उत्तर तुम्ही म्हणालात की, जे प्रत्यक्ष उपलब्ध नव्हते त्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवलात. तो तुमच्या मोबाईलवरनं पाठवलात का?

प्रभू – माझ्याकडून निरोप जातो, फोन जातो. त्यावेळच्या धावपळीत माझ्याकडून ते शक्य नव्हतं. यापूर्वीही मी कधी तसं पाठवलं नाही. मी प्रतोद असल्यापासून आणि त्याच्याआधीपासून व्हीपचा मेसेज पक्ष कार्यालातील कर्मचाऱ्यांकडून व्हीप दिला जातो.

जेठमलानी – हा जो व्हाट्सअॅप पाठवला होता तो मनोज चौगुले यांच्या व्हाट्सअॅप वरून पाठवला होता का?

प्रभू – मी मनोज चौगुले यांना व्हाट्सअॅपद्वारे पाठवण्यास सांगितले होते. त्यांनी ते पाठवले

जेठमलानी – व्हाट्सअॅपवर पाठवले गेले हे नक्की कशावरुन?

प्रभू – मनोज चौगुले म्हणाले की व्हाट्सअॅप पाठवले

जेठमलानी – मनोज चौगुले यांच्या फोनवरून आमदारांना मेसेज पाठवले आहे ते आपण सादर केलेले नाहीत. त्यामुळे आपण जे म्हटले आहे ते चुकीचे आहे

प्रभू – हे खोटे आहे

(जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यात खडाजंगी झाली. तुम्ही ज्युनिअर आहात मधेमधे बोलू नका, जेठमलानी कामत यांच्यावर चिडले)

जेठमलानी – मी माझे प्रश्न विचारत आहे

(शिंदे गट व ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये तू तू मैं मैं, विधानसभा अध्यक्षांकडून दोघांना समज)

विधानसभा अध्यक्ष – तुमच्या वादाचा परिणाम वेळकाढूपणामध्ये होत आहे. हे मी रेकॉर्ड मध्ये नोंद करतोय. मला ठराविक वेळेत हे प्रकरण निकाली काढायचे आहे