विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज नियमित सुनावणी पार पडली. ही सुनावणी नेहमीप्रमाणे दोन सत्रात पार पडली. सकाळी 11 वाजता ही सुनावणी पार पडली. जवळपास तीन तास पहिल्या सत्रातली सुनावणी पार पडली. त्यानंतर लंच ब्रेक झाला. लंच ब्रेकनंतर पुन्हा दुसऱ्या सत्रात सुनावणी पार पडली. सुनावणीच्या या दोन्ही सत्रांमध्ये ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्राविषयी प्रश्न विचारले. संबंधित पत्र नेमकं कसं पाठवलं होतं? असा प्रश्न जेठमलानी यांनी केला. त्यावर सुनील प्रभू यांनी सुरुवातीला व्हा्टसअॅपवर पाठवल्याचं म्हटलं. या मुद्द्यावरुन प्रचंड सवाल-जवाब झाले. विशेष म्हणजे लंचब्रेकनंतर सुनील प्रभू यांनी आपली साक्ष बदलली.
वकील महेश जेठमलानी : दिलीप लांडे यांची सही ही अनुक्रमांक 32 समोर आहे का?
सुनील प्रभू : 32 समोर सही केली आहे.
विधानसभा अध्यक्ष : तुम्ही स्पष्ट उत्तर द्या. तिथ सही आहे, मात्र ती लांडेचीच आहे का? असा त्यांचा प्रश्न आहे.
सुनील प्रभू : त्यांच्या नावासमोर सही आहे ती त्यांचीच असणार ना?
जेठमलानी : प्रतिज्ञापत्रात 50 व्या परिच्छेदात जे पत्र तुम्ही जोडले आहे त्यावर तुमचीच सही आहे का?
प्रभू : होय
जेठमलानी : हे पत्र तुम्ही एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलं आहे का? आणि त्याचा अर्थ तुम्हाला कोणी मराठीत समजावून सांगितला आहे का?
प्रभू : होय. हे पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून आहे. त्याचा मजकूर मला मराठीत समजावून सांगण्यात आला आहे.
जेठमलानी : आपण कथित पत्र एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिले आहे मग हे इंग्रजीत का लिहिले गेले?
प्रभू : भविष्यात कायदेशीर बाबींसाठी आवश्यकता भासू शकते म्हणून पत्र इंग्रजीत लिहिले आहे.
जेठमलानी : मराठीत लिहिलेले पत्र कायदेशीर प्रयोजनासाठी वापरता येणार नाही का?
प्रभू : नाही, हे म्हणणे चुकीचे आहे.
प्रभू : मला असं वाटलं म्हणून मी लिहिलं. कदाचित त्यावेळी मला ज्ञान नव्हतं. आता मला हे पाहिल्यावर कळलं की मराठी देखील चालतं.
जेठमलानी : जेव्हा आपल्या कोणत्याही पत्रा संदर्भात कायदेशीर बाबी उद्भवतील असे वाटते तेव्हा आपण इंग्रजी भाषेत पत्र लिहिता,असं म्हणणे योग्य आहे का?
प्रभू : हे खोटे आहे.
जेठमलानी : आपल्याला या पत्रासंदर्भात असे का वाटले की कायदेशीर पेच उद्भवू शकतो?
प्रभू : त्यावेळी राजकीय पेच असा निर्माण झाला होता की वाटले की भविष्यात कायदेशीर पेच उद्भवू शकतो.
जेठमलानी : आपल्याला या पत्राबाबत असे का वाटलं की कायदेशीर पेच उद्भवू शकतो?
प्रभू : त्यावेळी राजकीय पेच आणि संभ्रम निर्माण झाला होता. त्यातून कायदेशीर पेच भविष्यात निर्माण होतील असे मला वाटले.
जेठमलानी : यासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया उद्धवू शकते, असे 22 जून 2022 रोजी प्रथमच आपल्याला वाटले का?
प्रभू : यापूर्वी विधीमंडळात असे पेच निर्माण झाले त्यावेळी ते पेच न्यायालयात गेले आणि दाद मागितली गेली. हा पूर्व इतिहास होता म्हणून मला हे वाटले, बरोबर आहे.
जेठमलानी : इंग्रजीत लिहिलेले हे एकमेव पत्र आहे का?
प्रभू : नाही
जेठमलानी : या पत्रातील भाषा तुमची स्वतः ची आहे का?
प्रभू : मला त्यावेळी जे आकलन झाले ते मी लिहिले.
जेठमलानी : या पत्रात वापरलेली भाषा आपली स्वतःची आहे का?
प्रभू : मराठीत जे आकलन झाले, जे मला वाटलं लिहावेसे, ते मी इंग्रजीत भाषांतर करून लिहिले.
जेठमलानी : आपण हे पत्र मराठीत कुणाला सांगितले का?
प्रभू : मला आठवत नाही ते
जेठमलानी : या पत्राचा मराठी मसुदा आपल्याकडे आहे का?
प्रभू : आता नाही.
जेठमलानी : आपण मेल केला होता, तेव्हा मराठी मसुदा तयार केला होता का?
प्रभू : मला आता आठवत नाही.
जेठमलानी : या पत्राच्या अगोदर किंवा नंतर आपण कधी एकनाथ शिंदे यांना इंग्रजीत पत्र लिहिले आहे का?
प्रभू : होय लिहिलंय.
जेठमलानी : आपण एकनाथ शिंदे यांना 21 ते 30 जूनमध्ये इंग्रजीत पत्र लिहिल का?
प्रभू : होय
जेठमलानी : हे सोडून इतर कुठलं लिहिलं का?
प्रभू : होय लिहिलंय
जेठमलानी : आता ते आपण आता सादर करू शकता का?
प्रभू : रेकॉर्डवर आहे
जेठमलानी : 22 जून 2022 चे पत्र एकनाथ शिंदे यांना कोणत्या माध्यमातून दिले?
प्रभू : व्हॉट्सअपच्या माध्यमातून.
जेठमलानी : आपण आता यावेळी वाट्सअप मेसेज सादर करू शकता का?
प्रभू : आता नाही करू शकत.
जेठमलानी : उद्या सादर करु शकता का?
प्रभू : आता मी नेमकं सांगू शकत नाही. बघतो. मी प्रयत्न करतो.
जेठमलानी : आपण हा व्हॉट्सअप संदेश आपल्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवला आहे का?
प्रभू : मला नेमकं आठवत नाही. मी हा मेसेज माझ्या मोबाईलवरून पाठवला की कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवरून म्हणून म्हटलं प्रयत्न करतो.
जेठमलानी : आपण या पत्राची एक प्रत सादर केली आहे.. वाट्स अपवर पाठवलेली प्रत ही मुळ प्रत आहे असे समजायचे का?
प्रभू : नाही
जेठमलानी : पत्राची मूळ प्रत कुठे आहे
प्रभू : ओरिजिनल प्रत रेकॉर्डवर आहे
जेठमलानी : एकनाथ शिंदे यांना अशी कोणतीही मूळ प्रत पाठवण्यात आलेली नाही, असे मी आपल्याला सांगतो
प्रभू : हे खरं नाही
प्रभू – एकनाथ शिंदे यांना व्हाट्सअॅप नव्हे तर मेलवर पत्र पाठवलं. मी लंच ब्रेकमध्ये चेक केलं तर पत्र मेलवर पाठवल्याचे आढळले.
(प्रभूंची अध्यक्षांकडे साक्ष बदलण्याची विनंती, अध्यक्षांकडून मागणी मान्य)
जेठमलानी – प्रश्न क्रमांक १६५च्या उत्तरात बदल केला आहे. आपण म्हटलं की माहिती घेतली आहे. आपण कुणाकडून माहिती घेतली?
प्रभू – मी माझ्या कार्यालयाकडून माहिती घेतली.
जेठमलानी – आपण ही माहिती व्यक्तिशः कार्यालयात जाऊन घेतली? की फोनवरून घेतली?
प्रभू – माझ्यासोबत माझे सहकारी व सहाय्यक होते, त्यांना मी हे विचारले. त्यांकडून ही माहिती घेतली
जेठमलानी – तुम्ही स्वतः मेल केला होता का?
प्रभू – मी स्वतः नाही, तर माझ्या पार्टी ऑफिसमध्ये जोशी आहेत. त्यांना मेल करायला सांगितला होता.
जेठमलानी – आपण लंच ब्रेक दरम्यान जोशी यांच्याशी चर्चा करून त्यांनी हा मेल पाठवल्याची खात्री केली का?
प्रभू – होय
जेठमलानी – आपण जोशी यांच्याशी कुठे बोललात?
प्रभू – या इमारतीत बोललो
जेठमलानी – म्हणजे जोशी याठिकाणी उपस्थित आहेत, तुम्ही त्यांना येथे भेटला?
प्रभू – खाली कार्यालयात, तळमजल्याला. लंच टाईममध्ये दानवे साहेबांच्या केबिनमध्ये मी भोजनासाठी बसलो होतो, तिथे बोलवून मी त्यांना विचारले.
जेठमलानी – तुम्ही त्यांना नेमका कुठला प्रश्न विचारला ?
प्रभू – मी त्यांना असं विचारलं की एकनाथ शिंदे यांना पाठवलेली नोटीस मी व्हाट्सअप वर पाठवली असं म्हणालो. पण मला आठवत नाहीये आपण त्या दिवशी पाठवलेले मेल पण चेक करा. त्यावेळी त्यांना तो मेल आढळला आणि त्यांनी मला सांगितलं.
जेठमलानी – ज्याअर्थी त्यांना हे ईमेल सापडलेले आहेत, तुम्ही एकाच इमारतीत आहात तर तुम्ही त्यांना या ईमेलच्या प्रिंट आऊट का सादर करायला सांगितल्या नाहीत?
प्रभू – मी सांगितले ना तुम्हाला, मी खरं बोललो, मी उद्या तुमच्यासमोर सादर करतो
जेठमलानी – वरच्या उत्तरात तुम्ही जोशी यांची कार्यपद्धती सांगितली आहे. ती तुम्हाला कधी पासून माहीत आहे?
सुनील प्रभू – जेव्हा पासून आमदारांना ईमेल आणि पत्र पाठविण्याची पद्धत सुरु झाली तेव्हापासून
जेठमलानी – जोशी यांचं हे काम आहे हे तुम्हाला कधीपासून माहीत आहे?
प्रभू – जेव्हापासून ईमेल वरती आमदारांना पत्र आणि व्हीप पाठवण्याची पद्धत सुरू झाली तेव्हापासून
जेठमलानी – या प्रथेबाबत 2014 पासून तुम्हाला माहित होतं तर 22 जूनला एकनाथ शिंदे यांना इंग्रजीतून पाठवलेल पत्र ईमेलवरून पाठवलं आहे हे तुम्ही तुमच्या अपत्रता याचिकेत का नाही सांगितल?
प्रभू – रेकोर्डवर आहे
प्रभू – मला सगळ्या पद्धती माहिती आहेत. तुमच्या वांद्रे येथील प्रचार मी केला होता. मी घोषणा देण्यासाठी पुढे होतो. जेठमलानी साहेब आगे बढो. मी तुमचा प्रचार केला आहे. तुमचे प्रचार प्रमुख अनिल परब होते, असं म्हणत सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांना कोपरखळी मारली.
जेठमलानी- हो मला माहिती आहे, तेव्हा युती होती
अध्यक्ष – (उपहासात्कम) म्हणून तर सोपे प्रश्न येत नाही ना?
सुनावणीदरम्यान एकच हास्यकल्लोळ
जेठमलानी – जेवणाच्या सुट्टी दरम्यान असं काय आठवलं की तुम्ही जोशींसोबत बोललात?
प्रभू – पत्र हे वॉट्सपने पाठवलं असं म्हटलं होत. पण माझ्या मनात शंका होती. खरी बाजू पटलावर यावी म्हणून जोशी सोबत बोलून घेतलं.
जेठमलानी – एकनाथ शिंदे यांना जोशी यांनी पाठवलेला ईमेल आता आपण मागवून घेऊ शकता का?
प्रभू – मी उद्या सादर करतो म्हणून बोललो आहे
जेठमलानी – आत्ता जर तुम्ही एकाच इमारतीत आहात तर आत्ता का नाही
प्रभू – सर ते ४ वाजता निघून गेले असतील, म्हणून मी म्हटलं की उद्या सकाळच्या सत्रात सादर करतो
जेठमलानी – जर ते आता असतील, तर विचारून घ्या. उद्यापर्यंत कशाला वाट पाहायची
प्रभू – मी आता लगेच चेक करतो
जेठमलानी – प्रश्न क्रमांक १६५मध्ये आपण काही चूक केलेली आहे, हे आपल्याला आठवले नाही तर ते त्या प्रश्नाचे स्वरूप बदलण्यासाठी आपणास सांगितले आहे
प्रभू – हे खोटे आहे
जेठमलानी – प्रतिवादी भाजपशी संगनमत करून काम करत नव्हते, तर भाजपशी असलेल्या प्रदीर्घ संबंधांनंतर काम करत होते. कारण प्रतिवाद्यांचे भाजपशी चांगले संबंध होते.
प्रभू – हे खरे नाही.
जेठमलानी – पॅरा 51 मध्ये respondant ( एकनाथ शिंदे ) यांच्या बाबत उल्लेख आहे ते 21 जून 22 पासून पक्ष विरोधी करवायांमध्ये गुंतलेले नव्हते
प्रभू – हे खोट आहे
जेठमलानी – 51 मध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते शिवसेनाच्या हितार्थ काम करत होते. कारण निवडणूक पूर्व युती फायद्याची आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती मतदारांचा विश्वासघात करणारी आहे
प्रभू – हे खोटं आहे
जेठमलानी – प्रतिवादी भाजपशी संगनमत करून काम करत नव्हते ते भाजपशी असलेल्या संबंधातून काम करत होते. प्रतिवादी यांचे भाजपच्या अनेक नेत्यांशी चांगले संबंध होते
प्रभू – हे खरं नाही.
जेठमलानी – 52 मध्ये ज्यांचा उल्लेख आहे ते आमदार चुकीचे वागले नाहीत
प्रभू – हे खोटं आहे
जेठमलानी – परिच्छेद 52 मध्ये उल्लेख केलेल्या आमदारांनी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही.
प्रभू – चुकीचं म्हणजे काय?
अध्यक्ष – ज्या आमदारांचा उल्लेख परिच्छेद 52 मध्ये केला आहे ते आमदार चुकीचं वागले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे.
प्रभू – हे खोटं आहे.
जेठमलानी – पॅरा 53 पहा, 25 जून 22 ला अनिल देसाई यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांना लिहिलेल्या पत्राचा चुकीच्या तथ्यांवर आधारित आहे
प्रभू – हे खोटं आहे
दरम्यान, 22 जून 2022 रोजी सुनील प्रभू यांच्या वतीने एकनाथ शिंदे यांना पाठवलेला मेल ठाकरे गटाच्या वतीने सादर करण्यात आला जो विधिमंडळ पक्ष कार्यालय सचिव विजय जोशी यांनी पाठवला होता. त्याची कॉपी अध्यक्षांसमोर ठेवली आहे. दरम्यान, शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी संपली. या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होईल.
विधानसभा अध्यक्षांसमोर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाची उलट तपासणी सुरु आहे. पण ही उलट तपासणी उद्या संपणार आहे. त्यानंतर शिंदे गटाची उलट तपासणी होणार आहे. 1, 2,7,8 डिसेंबर या तारखेदरम्यान शिंदे गटाची उलट तपासणी होणार आहे. या प्रकरणी आता 11 ते 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे. 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20 डिसेंबर दरम्यान अंतिम सुनावणी होणार आहे. तसेच या सुनावणीसाठी 21, 22 डिसेंबर हे अधिकचे दोन दिवस दिले जाण्याची शक्यता आहे.