मुंबई: सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा आता बंद झाला आहे. हा भोंगा आता वाजणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. शिंदे यांच्या या टीकेचा संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत (sunil raut) यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊतांचा (Sanjay Raut) भोंगा सुरू होता म्हणून महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडी झाल्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास खातं मिळालं. हा भोंगा वाजला नसता तर शिंदेंना नगरविकास खातं मिळालं असतं का? हा भोंगा वाजला नसता तर एकनाथ शिंदे मंत्री तरी झाले असते का? असा सवालच सुनील राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधला आहे. शिंदेंना जे मिळालं ते या भोंग्यामुळेच. त्यामुळे शिंदेंनी भोंग्याबद्दल सांगू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
संजय राऊत भाजपच्या विरोधात बोलत होते. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरेंना कमजोर करायचं आहे. त्यामुळेच बोगस प्रकरण त्यांच्यामागे लावण्यात आलं आहे. ईडी काहीही आरोप लावेल. मीही उद्या ईडीवर आरोप करू शकतो, असं सांगतानाच सुप्रिया सुळेंचा फोन आला होता. राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी तुमच्या सोबत आहे. तुम्ही एकटे नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या, असं सुनील राऊत यांनी सांगितलं.
भावना गवळीही गेली अनेक महिने गायब होत्या. त्या शिंदे गटात आल्या आणि त्यांच्या दोन माणसाला जामीन मिळतो. त्यांना क्लीनचिट मिळते. याचा अर्थ ईडी संपूर्णपणे भाजप चालवत आहे. जे लोक भाजपला सरेंडर होतात, त्यांना क्लिनचीट मिळते. पण राऊत ईडीला सामोरे गेले. यातून ते परफेक्टपणे बाहेर पडतील, असंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे राऊतांना भेटायला गेले. पण भावना गवळींना का भेटायला गेले नाही? असा सवाल शिंदे गटातून केला जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भावना गवळींच्या घरी जायला त्यांना अटक केली होती का? राऊत ज्या पद्धतीने ईडीला सामोरे गेले अटक करून घेतली, त्यामुळे उद्धव साहेबांना त्यांचा अभिमान आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता राऊत सामोरे गेले. माझी आई 80 वर्षाची आहे. त्यामुळे उद्धव साहेब येऊन भेटले, असं ते म्हणाले.