मुंबई: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासोबत गेलेले 50 आमदार मनाने शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे शिवसेनेने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे. तसेच भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या. त्यामुळे भाजपसोबतची चर्चेची दारे उघडी राहतील, अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला मतदान करायचं यावर चर्चा झाली. यावेळी खासदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. तसंच या बाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाली. द्रोपदी मुर्मू या आदिवासी महिला आहेत. त्यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली. यशवंत सिन्हा यांच्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेने अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना पाठबळ दिलं आहे. टीएन शेषण असतील, प्रतिभाताई पाटील असतील, प्रणव मुखर्जी असतील. असे निर्णय सेनेने घेतले आहेत. या बाबत चर्चा झाली. उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यांचा आदेश हा सर्व खासदार आणि आमदारांना बंधनकारक आहे, असं राऊत म्हणाले.
आजच्या चार पाच खासदार नव्हते. ते बाहेर होते. संजय मंडलिक दिल्लीत आहेत. इतरांनी येणार नसल्याचं कळवलं होतं. संजय बंडू जाधव आजारी आहेत. ते वारीला गेले होते. हेमंत पाटलांनी फोन केला होता. गुजरातमध्ये पूर आहे म्हणून कलाबेन डेलकर पोहोचू शकल्या नाही. अनिल देसाई कोर्टाच्या कामानिमित्त दिल्लीत आहे. श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी यांच्याबाबतची माहिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. पक्षप्रमुखांचा निर्णय असतो त्याबरोबर राऊत असतात. बातम्या चालवतात ते मुर्ख आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचे पक्षप्रमुख समर्थ आहेत निर्णय घ्यायला. महाराष्ट्र आणि देशाच्या भावना समजूनच ते निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.
आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी झाल्याची बातमी दैनिक सामनात प्रसिद्ध झाली आहे. ती पुरेशी आहे. नवीन जिल्हाप्रमुख नेमले जातील. सेना ही ठाकरेंची आहे. कुणाची नाही. पक्षप्रमुखांनी घेतलेले निर्णय अंतिम असतात. कुणाला वाटत असेल अधिकार नाही तर ते भ्रमात आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
बाळासाहेब हे सर्वांचे गुरु होते. त्यांच्या सारखा गुरु मिळणे मुश्किल आहे. त्यांनी आम्हाला घडवलं आणि मार्गदर्शन केलं. या गुरुला मानवंदना देणं हे आमचे कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे हे गुरुस्थानी आहेत. पक्षाचे नेतृत्व असतं ते गुरुस्थानी असतं, असंही ते म्हणाले.