मुंबई: विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे (gopinath munde) व पंकजा मुंडे (pankaja munde) यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी घणाघाती टीकाही राऊत यांनी केली आहे. दैनिक ‘सामना’च्या रोखठोक सदरातून राऊत यांनी ही टीका केली आहे.
पैगंबरांचा अपमान करणाऱ्या नूपुर शर्मांना फडणवीस फोन करून ”बेटी, चिंता मत करो!” असा धीर देतात तेव्हा आश्चर्य वाटते. ज्या नूपुर शर्मांच्या वक्तव्यामुळे देश दहशतवादी हल्ल्याच्या स्फोटकांवर उभा आहे, त्यांना एक नेता कसे काय पाठबळ देऊ शकतो? पंकजा मुंडे वाऱ्यावर आहेत व देशात अराजक माजवू पाहणाऱ्या नूपुर शर्मासारख्यांना भाजपचा राजाश्रय आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण भाजपचा विजयोत्सव आणखी काही दिवस सुरू राहील. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी न दिल्याचे फळ त्यांना मिळाले, असे भाजप व फडणवीस यांच्यातर्फे सांगितले गेले. मग धनंजय महाडिकांच्या जागी भाजपने संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार बनवून राज्यसभेसाठी का विजयी केले नाही? हा माझा प्रश्न आहे. सर्वच गोष्टींचे राजकारण व राजकारणाचा व्यापार करायचा हे त्यांचे धोरण. विधान परिषदेची निवडणुकही त्यांनी तागडीवरच ठेवली आहे. केंद्रीय यंत्रणांची लाठी-काठी हातातून दूर केली तर भाजपकडे काय उरते? त्यांचीही मूठ रिकामीच आहे! देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत, पण या व्यापारी साठमारीत महाराष्ट्राला काय मिळाले?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधतानाही आपल्या म्हणण्याचं समर्थन केलं आहे. आम्हाला मुंडे कुटुंबाची चिंता आहे. कारण त्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे संबंध जिव्हाळ्याचे होते. पण त्या कुटुंबाबत काही घडत असेल तर आम्हाला चिंता वाटणारच. राजकारण राजकारणाच्या तागडीत. ते तुमचं तुम्ही बघा. पण पंकजा मुंडे असेल, प्रीतम असेल यांचं ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. युती टिकवण्यात वाढवण्यात मुंडे साहेबांची मोठी भूमिका होती, असंही ते म्हणाले.