वळसे पाटील आमचेही गृहमंत्री, मग राष्ट्रवादी आमदारपुत्र आणि शिवसैनिकांना वेगळा न्याय का? राऊत कडाडले

| Updated on: Jun 04, 2021 | 4:44 PM

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वत: खेडमध्ये जाऊन दिलीप मोहिते पाटील यांना येत्या निवडणुकीत पाडण्याचा निर्धार केला.

वळसे पाटील आमचेही गृहमंत्री, मग राष्ट्रवादी आमदारपुत्र आणि शिवसैनिकांना वेगळा न्याय का? राऊत कडाडले
Dilip Walse Patil_Sanjay Raut
Follow us on

पुणे : खेड पंचायत समितीच्या (Khed Panchayat Samiti) वादातून शिवसेनेने (Shiv Sena) राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (NCP MLA Dilip Mohite Patil ) यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वत: खेडमध्ये जाऊन दिलीप मोहिते पाटील यांना येत्या निवडणुकीत पाडण्याचा निर्धार केला. शिवसेनेचे नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सेनेची सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे संजय राऊत आक्रमक झाले. (Shiv Sena MP Sanjay Raut attacks on Khed NCP MLA Dilip Mohite Patil ask question to home minister Dilip Walse Patil )

यावेळी संजय राऊत यांनी खेडमध्ये जाऊन राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहित पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यातील महाविकास आघाडी शाबूत आहे. आम्ही नियमात बांधलो आहोत. मात्र दिलीप मोहिते पाटलांची वागणूक अशीच राहिली तर त्यांना येत्या निवडणुकीत पाडल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

गृहमंत्र्यांना सवाल

यावेळी संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनाही सवाल केला. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या मुलाने गोळीबार केला, त्याला अटक केली. मात्र त्याला बुरखा घालून मीडियासमोर आणलं नाही. पण खेड परिसरात कुणीतरी गोळीबार केला, त्यावर या भागातले शिवसैनिक, सभापती, नगरसेवक त्यांना तुम्ही अज्ञाताच्या गोळीबाराखाली अटक करता, काळा बुरखा घालता, मीडियासमोर आणता, मग इतर ठिकाणी अशी कारवाई का नाही? हा काय प्रकार आहे? कायदा सर्वांसाठी सारखा असेल, गृहमंत्री आपले आहेत, सर्वांचे आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय 14 पैकी 11 जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला आहे. खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केलेय. सदस्यांचा पंचवार्षिक कालावधी संपायला 9 महिने बाकी असतानाच पद मिळवण्याची चढाओढ सुरू झालीय. सभापती, उपसभापती निवडणुकांमध्येही शिवसेनेत मतभेद असल्याचं चव्हाट्यावर आलेय. सर्व पक्षीय 14 पैकी 11 सदस्यांनी आणि सेनेच्या सदस्या सुनीता सांडभोर यांनी अविश्वास ठराव आणल्याची माहिती मिळाली असून, यात राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांचा सहभाग असल्याचंही बोललं जातंय. तर दुसरीकडे सभापती भगवान पोखरकर यांनी सेनेचे तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या या बंडखोरीमागे दिलीप मोहितेंचा हात असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरण 

पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्यावरील गोळीबार प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, पीए यांच्यासह 8 ते 9 जणांवर अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गोळीबार करणारा आरोपी तानाजी पवार याच्यासह तिघांवर आमदार आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्यासाठी गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार 12 मे रोजी गोळीबार झाला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. ही घटना काल दुपारी दीडच्या सुमारास घडली होती.

अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार का झाला?

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

VIDEO : संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 

(Shiv Sena MP Sanjay Raut attacks on Khed NCP MLA Dilip Mohite Patil ask question to home minister Dilip Walse Patil )

संबंधित बातम्या 

उद्धव ठाकरेंच्या सल्ल्याने आलोय, अजितदादा तुमच्या आमदाराला वेसण घाला, संजय राऊत कडाडले

खेड पंचायत समितीचा नेमका वाद काय? संजय राऊत पहिल्यांदाच महाविकास आघाडीविरोधात का बोलले?

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना नेमका कसला माज? महाविकास आघाडी असो की नसो, त्यांना पाडणार : संजय राऊत  

CCTV VIDEO | राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार करणाऱ्याचीच उलट तक्रार, आमदाराच्या मुलावर गुन्हा