नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये फटका बसल्यानंतरही शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत शिवसेना कायम स्वबळावर लढते. शिवसेना हा मोठा पक्ष आहे. या निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याच्यादृष्टीने शिवसेनेची तयारी सुरु आहे. पाच वर्षांपूर्वी निवडणूक ही आमच्या ताकदीवर आम्ही जिंकलो होतो. मुंबईवर आताही शिवसेनेचंच राज्य असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
ते शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भातही भाष्य केले. दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने साजरा होईल. हा एक सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दसरा मेळाव्याची तयारी करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
ही राजकीय छापेमारी असेल किंवा आयकर असेल, सीबीआय असेल, ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
संपूर्ण सोशल मीडियाचा वापर द्वेषाचा आणि सुडाचं राजकारण करण्यासाठी केला जातो. आपल्या राजकीय विरोधकांची बदनामी करण्यासाठी केला जातो, जर कोणी आंतरराष्ट्रीय मंचावर आवाज उठवला असेल तर त्याचं समर्थन व्हायला हवं, असंही राऊत म्हणाले.
दिल्लीतून राजकीय दबाव आणण्याचा व आावज दडपण्याचं काम सुरु आहे. केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर करुन वाईट पायंडे पाडले जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
संबंधित बातम्या:
ZP निवडणुकीत बाजी मारली, आता महानगपालिकेसाठी प्लॅन तयार, नागपुरात काँग्रेसमध्ये उत्साह संचारला
झेडपी, पंचायत समितीचा निकाल आणि आयटीच्या छाप्याचा संबंध आहे का? रोहित पवारांचा खोचक सवाल