मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीतून भाजपने पंकजा मुंडे (pankaja munde) यांना डावललं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपला (bjp) जोरदार टोले लगावले आहेत. कुणाला उमेदवारी द्यावी आणि कुणाला उमेदवारी देऊ नये हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. मग कुणीही असेल. खडसेंना द्यायचं की डावलायचं. पंकडा मुंडेंना द्यायचं की डावलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मुंडे, महाजन यांचा शिवसेना भाजप युतीच्या काळात निकटचा संबंध आला होता. या दोन नेत्यांमुळे युतीला बळ मिळालं. मुंडे लोकनेते होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतच्या बातम्या व्यथितक करणाऱ्या आहेत. म्हणून बोलतोय. पंकजा मुंडे या वडिलांप्रमाणे ओबीसींच्या नेत्या आहेत. बहुजन समाजाच्या नेत्या आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यावर ज्या प्रकारचे पडसाद विविध क्षेत्रात उमटले ते पाहिल्यावर वाटलं कुणी तरी पडद्यामागून मुंडे, महाजन यांचं नाव देशातून किंवा राजकारणातून संपवण्याचे प्रयत्न करत आहे का ही शंका आहे, असं सांगतानाच फक्त मुंडे कुटुंबाचा विषय होता म्हणून बोललो. आजही मुंडे या नावाचा प्रभाव आणि पगडा महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. भाजप विधानपरिषदेची सहावी जागा लढवत आहे. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना सहावी जागा लढू द्या, सातवी जागा लढू द्या. त्यांना महाराष्ट्रात फक्त गोंधळ निर्माण करायचा आहे. पैशाचा खेळ करायचा आहे. पण आम्ही सर्वच्या सर्व जागा जिंकू. त्यांची काही गणितं असतील. ते त्यांच्या वहीपुस्तकात आहेत. आमच्याही चोपड्या तयार आहेत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
हॉटेल ट्रायडंटमध्ये भाजप नेते आशिष शेलार हे आघाडीच्या आमदारांशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तो व्हिडीओ चुकीचा आहे. मी ताजमध्ये चाललोय. माझ्या मिटिंगसाठी चाललो आहे. मलाही भाजपचे आमदार ते भेटू शकतील. पण याचा अर्थ काही वेगळा लावता येत नाही, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रासह भाजपवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. देशात दहशतवाद वाढत आहे. त्याला भाजप जबाबदार आहे. भाजपचे प्रवक्ते दोन धर्मात झगडे लावत आहे. दोन समाजात दुही निर्माण करत आहेत. भारताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्या देशात काही झालं तर त्याला केवळ भाजपच जबाबदार असेल. याला पूर्णपणे जबाबदार भाजप जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.