मुंबई: सर्वोच्च न्यायालय (supreme court) या देशात कायद्याची व घटनेची पायमल्ली होऊ देणार नाही. कोर्ट महाराष्ट्रातील सर्व बाजू समजून घेईल. जे घटनेला मान्य त्यानुसार न्याय मिळेल याची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी कोणतीही कॉमेंट करणार नाही. आमची बाजू भक्कम आहे. कायदेशीररित्या आमची बाजू भक्कम आहे. घटनेची पायमल्ली झाली नाही. 10 व्या परिशिष्टानुसार होईल तो निर्णय होईल, असंही राऊत यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांवर कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटाच्या कोणत्या आमदारांवर कारवाई होणार नाही. तसेच कोर्टाने आज या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ नेमणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टात आज आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी झाली. यावेळी शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले. मात्र, कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणी घटनापीठ स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, घटनापीठ स्थापन करण्यास विलंब होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कोर्ट या प्रकरणाच्या सुनावणीसाठी घटनापीठ कधी स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
कोर्टात सुनावणी सुरू होण्यापूर्वी राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. त्यावर निर्णय होणार आहे. मात्र, राज्यात नवं सरकार स्थापण्यासाठी राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत, आम्हीच जिंकणार आहोत. आमच्या बाजूने निर्णय लागेल. काय कोर्ट यांच्या खिशात आहे का? त्यांची बटीक आहे का? नाही, असं राऊत म्हणाले.
अपात्र आमदारांच्या निलंबनावर आज कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणावर कोर्टाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. मात्र, पुढील सुनावणीची तारीख दिलेली नाही. त्यामुळे घटनापीठ बसल्यावरच नवीन तारीख दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दोन्ही गटाच्या आमदारांवर तोपर्यंत कारवाई होणार नाही.