उरण (रायगड) : पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा पत्ता कट होणार का, या चर्चांना आणखी जोर चढला आहे. याचं कारणही तसेच आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथे शिवस्मारकाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात उपस्थित असलेले मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना भाषणच करु दिले गेले नाही.
उरणमधील कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह स्थानिक आमदार, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांनी भाषण करणं अपेक्षित होते, मात्र त्यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी भाषण केले.
श्रीरंग बारणे यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असूनही त्यांना भाषण करु न दिल्याने, मावळमधून त्यांचा पत्ता कट करण्यात आला का, या चर्चेलाही जोर चढला आहे.
उरणमधील कार्यक्रम श्री सदस्यांसाठी महत्त्वाचा असला, तरी भाजप आणि शिवसेनेने या कार्यक्रमाकडे प्रचार म्हणूनच पाहिल्याचे दिसले. मात्र, अशा कार्यक्रमात स्थानिक खासदाराला भाषण करु न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार
या निमित्ताने शिवसेना-भाजपच्या युतीवरही अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब झाला असून, पालघर आणि मावळमध्ये अदलाबदल करण्याच निर्णय युतीच्या चर्चेत झाला असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या मावळ शिवसेनेकडे आहे, तो मतदरासंघ भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच की काय, शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात साधे बोलूही दिले गेले नाही.
आता विद्यमान खासदारांनाच त्यांच्या मतदारसंघातील भव्य कार्यक्रमात बोलू दिले जात नसल्याने, अर्थात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहेच. सोबत विविध अंदाजांनाही बळकटी मिळाली आहे.