मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला 300 पार जागा मिळाल्यानंतर, आता राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर या दोन्ही पक्षांनी तातडीने विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावर चर्चाही सुरु केली आहे.
चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’वर
लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला मिळलेल्या यशानंतर शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि महसूल व कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (28 मे 2019) ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा केली.
कुणाला किती जागा?
विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपाबाबत शिवसेनेने भाजपसमोर एक प्रस्ताव मांडला. यानुसार 288 पैकी प्रत्येकी 144 जागा दोघांच्या वाट्याला येतील. भाजपचे 123 आणि शिवसेनेचे 63 मतदारसंघ जागा वाटपात कायम राहतील. भाजपला 10 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने त्या जागा जागावाटपात भाजपच्या कोट्यात राहतील. त्यामुळे त्यांच्या 133 जागा नक्की आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या कोट्यातील शिल्लक राहिलेल्या 11 जागांपैकी कोणत्या घ्यायच्या हे ठरविल्यास जागा वाटपाला अंतिम स्वरुप मिळेल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काय चित्र?
लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतील प्रचंड मोठं यश मिळालं. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी 23 जागा भाजपला, 18 जागा शिवसेनेला मिळाल्या. म्हणजेच, 48 पैकी 41 जागांवर महायुतीने यश मिळवलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठीही महायुतीत उत्साहाचं वातावरण दिसतं आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयासारखेच चित्र विधानसभेत असेल, अशी दोन्ही पक्षांना आशा आहे.
घटकपक्षांना लोकसभेत एकही जागा नाही, विधानसभेत किती?
दरम्यान, शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा जरी झाली असली, तरी या चर्चेत कुठेही महायुतीतले घटकपक्ष अर्थात रामदास आठवलेंचा रिपाइं पक्ष, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष कुठेही दिसला नाही. त्यामुळे या घटकपक्षांना शिवसेना-भाजप कशाप्रकारे सांभाळून घेतं आणि त्यांना किती जागा सोडतात, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.