Shiv Sena : भाजपचे वाढणारे बळ कृत्रिम आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे, असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे.
मुंबई: शिवसेना (shivsena) संपत चालली आहे, असं विधान भाजपचे (bjp) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda) यांनी केलं होतं. नड्डा यांच्या या विधानाचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मऱ्हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळय़ाच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की, भाजपने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळ्यांच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही, असा सल्ला वजा इशारा शिवसेनेने जेपी नड्डा यांना दिला आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून हा इशारा देण्यात आला आहे.
गुजरातमधील दंगलीचे निमित्त करून मोदींना राजधर्माची आठवण करून देणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. तेव्हा ‘राजधर्म वगैरे ठेवा बाजूला, हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका, गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उठवू नका,’ असे ठणकावून बोलणारे देशात एकमेव शिवसेनाप्रमुखच होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्याची भाषा बोलत आहेत व ही भाषा घराणेशाहीपेक्षा भयंकर आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे.
हे सुद्धा वाचा
शिवसेनेचा हल्लाबोल
महाराष्ट्रात शिवसेनेशी लढता येत नाही म्हणून त्यांनी ‘ईडी’ वगैरेंचा धाक दाखवून शिवसेना फोडली व हे फुटक्या कवडीचे फुटीर लोक खिशात ठेवून ते शिवसेनेस आव्हान देत आहेत. तुमच्या खिशातले फुटक्या कवडीचे लोक संपतील, पण बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा आकाशाला गवसणी घालेल. तुमच्या धमक्यांना भीक घालणारी शिवसेना नाही. ‘संपवू’ वगैरे भाषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्यांना करा. नड्डा यांची भाषा लोकशाहीसाठी मारक आहे, पण ते ज्यांच्या सावलीत वावरत आहेत ते पाहता त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी? एक चांगला माणूसही वाया गेला याचेच दुःख जास्त आहे.
आजचा भाजपचा वंश हा खरेच खऱ्या भाजपच्या गर्भातून वाढला आहे काय? महाराष्ट्रापासून देशात सर्वत्र काँग्रेससह अनेक पक्ष फोडूनच भाजपची वाढ झाली. म्हणजे भाजपचे डोके असले तरी हात, पाय, नाक, कान वगैरे सगळे दुसऱ्यांचे आहे व शिवणकाम करून ते शरीर जुळवले आहे. तुमच्याच वंशवेलीचा पत्ता नाही आणि तुम्ही देशातील इतर पक्षांना संपवायची भाषा करताय.
जे आपल्या विरोधात आहेत त्यांना ‘ईडी’ अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुरुंगात टाकायचे व विरोधकांतील जे कलंकित शरण येतील, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुऊन आपल्या गाठीशी बांधायचे, ही काय लोकशाही म्हणायची? राजकारणात फक्त आम्ही आणि आम्हीच ही भाषा हुकूमशाहीची आहे. एकाधिकारशाहीची आहे. ही जनमानी नसून मनमानी आहे. जे जे नजरेस येईल त्या सगळ्यांचा मालक मीच आहे या विचाराने भाजप वागत असेल तर त्यांचा आणीबाणीविरुद्धचा लढा एक ढोंग होते असेच मानावे लागेल.
भाजपचे वाढणारे बळ कृत्रिम आहे. इतर पक्षांचे सदस्य व नेते फोडण्यासाठी भाजप फक्त दडपण आणि दहशत याचाच वापर करीत आहे, असे नव्हे तर या दडपशाहीला किंवा प्रलोभनांना बळी न पडलेल्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली जात आहे. तरीही या सगळय़ाला भीक न घालता प. बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक पक्ष उभे आहेत व लढत आहेत. कारण त्यांची नाळ पक्की आहे. जे. पी. नड्डा यांनी हे समजून घेतले पाहिजे.