मुंबई: भाजपच्या (bjp) मनात बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता. तो डाव तडीस जात नव्हता. शेवटी शिंदे व त्यांच्या समर्थकांवर ईडी (ed) वगैरेची तलवार लावून त्यांनी शिवसेना संपविण्याचा डाव टाकलाच. पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे. शिवसेना नवी उभारी घेत आहे. ती वेगाने आकाशाला गवसणी घालेल व शिवसेना (shivsena) संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही, असं सांगतानाच ‘ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही, असा टोला शिवसेनेने शिंदे गटाल लावला आहे. दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, ”ईडीला घाबरून कुणी आमच्याकडे येऊ नका.” मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की, ”राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. माझी विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका.” मुख्यमंत्र्यांना 40 आमदारांचे समर्थन आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले. स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.