मुंबई: एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात असं एकदा टिळक म्हणाले होते. अभिनेत्री कंगना रानौतला हे वक्तव्य तंतोतंत लागू पडते, अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. 1947 साली भारताला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले, असे वक्तव्य कंगना रानौतने केले होते. कंगनाबेनच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या नकली राष्ट्रवादाची गाळण उडाली आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाने भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. या वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाला सर्वोच्च अशा नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.
रक्त, घाम, अश्रू आणि त्यागातून मिळालेल्या आमच्या स्वातंत्र्याला भीक असे संबोधणे हे राष्ट्रद्रोहाचेच प्रकरण आहे. अशा व्यक्तीस पद्मश्री पुरस्कार देशाचे राष्ट्रपती देतात. त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी उपस्थित असतात आणि स्वातंत्र्यास भीकेची उपमा देणाऱ्या कंगनाबेनचे डोळे भरुन कौतुक करतात. भाजपला स्वातंत्र्य आणि क्रांतिकारांच्या बलिदानाची थोडी जरी चाड असेल तर राष्ट्रद्रोही वक्तव्याबद्दल कंगनाबेनचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले पाहिजेत, असे शिवसेनेने म्हटले आहे.
भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी कंगनाबेनच्या भिक्कार वक्तव्याचा धिक्कार केला. हा देशद्रोहच आहे असे वरुण गांधी सांगतात. अनुपम खेर यांनीही कंगनाचा लाजत लाजत निषेध केला. पण भाजपमधील प्रखर राष्ट्रवादी अद्याप गप्प का आहेत, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
1947 साली भारताला स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली. पण या भीक मागण्याच्या प्रक्रियेत कंगनाचे सध्याचे राजकीय पूर्वज कोठेच नव्हते, अशी टिप्पणीही अग्रलेखातून करण्यात आली आहे. कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातील उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल, असे अग्रलेखात म्हटले आहे.
संबंधित बातम्या:
‘1947मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं!’, कंगना रनौतने उधळली मुक्ताफळे!
कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची राष्ट्रपतींकडे मागणी