मुंबई: उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कीर्तिकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे नेतेपदही काढून घेण्यात आले आहे.
गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाने तात्काळ पत्रक काढून कीर्तिकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं. कीर्तिकर यांचं शिवसेना नेतेपदही काढून घेण्यात आल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त आजच्या दैनिक सामनातही देण्यात आलं आहे.
दरम्यान, काल प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी खासदार राहुल शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि खासदार भावना गवळी यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही पदाची अपेक्षा न करता केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आपण पक्षप्रवेश करत असल्याची भावना यावेळी कीर्तिकर यांनी व्यक्त केली. तसेचबाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आपल्याला पक्षात सतत डावलले गेल्याची खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखविली.
यापुढे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बांधणीसाठी, पक्ष शिस्तीसाठी आणि पदाधिकारी कार्यकर्ते घडविण्यासाठी आपण कार्यालयीन कामकाजात अग्रेसर राहणार असल्याचेही किर्तीकर यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी या कार्यक्रमात गजानन किर्तीकर यांनी पक्ष प्रवेशाबाबत लिहिलेले वृत्त निवेदन वाचून दाखविले.
तर, बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हीतासाठी अनेक वर्ष कार्यरत असणारे शिवसेना ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या प्रवेशाने पक्षाला नवं बळ मिळालं, अशी भावना मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांनी व्यक्त केली.