Sanjay Raut : संभाजी छत्रपतींची मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली?, राऊत म्हणतात, शिवसेना सहावी जागा लढणार

| Updated on: May 20, 2022 | 12:41 PM

Sanjay Raut : शिवसेना आपल्या अटीवर कायम आहे. राज्यसभा उमेदवारीसाठी छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करावा लागेल तरच त्यांना पाठिंबा देणार असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे.

Sanjay Raut : संभाजी छत्रपतींची मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली?, राऊत म्हणतात, शिवसेना सहावी जागा लढणार
संभाजी छत्रपतींची मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली?, राऊत म्हणतात, शिवसेना सहावी जागा लढणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांच्या राज्यसभेवर (rajyasabha election) जाण्याच्या मार्गात अडथळे वाढताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही संभाजी छत्रपती यांना पाठिंबा देतील असा कयास होता. मात्र, संभाजी छत्रपती शिवसेनेत आले तरच त्यांना पाठिंबा देऊ अशी अट घातल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे संभाजी छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. यावेळी संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. मात्र, या दोन्ही नेत्यांमधील चर्चा फिस्कटल्याचं सांगण्यात येतं. संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली असतानाच आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधला. शिवसेना सहावी जागा लढणारच असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. यावरून मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल. संभाजी छत्रपती हे शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर त्यांचा विचार करेल. संभाजीराजे सर्वांनाच प्रिय आहे. पण शिवसेना सहावी जागा लढणार आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

संभाजी राजेंचा प्रस्ताव फेटाळला?

दरम्यान, शिवसेना आपल्या अटीवर कायम आहे. राज्यसभा उमेदवारीसाठी छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करावा लागेल तरच त्यांना पाठिंबा देणार असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काल मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणुकीत सहकार्य करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली. आपल्याला शिवसेनेपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करून पाठिंबा देण्याचा प्रस्ताव छत्रपतींनी उद्धव ठाकरे यांच्यापुढे ठेवला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींपुढे राज्यसभेसाठी शिवसेना पक्षप्रवेशाची अट कायम ठेवल्याचे समजते.

संभाजीराजेंच्या भेटीगाठी

दरम्यान, संभाजी छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्याचे घोषित केले आहे. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीसाठी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच सर्व आमदारांना पत्रं लिहून आपल्याला पाठिंबा देण्याची विनंतीही केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.