बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी तिरुपती बालाजीला पायी निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाला होता. सुमंत रुईकर असे त्यांचे नाव आहे. ते मुळ बीड येथील रहिवासी आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतर शिवसेनेकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांची जबाबदारी घेतली आहे. तसेच त्यांना पाच लाखांची मदत देखील देण्यात आली आहे. या मदतीने रुईकर कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉलद्वारे रुईकर कुटुंबीयांशी संवाद साधला, त्यांनी सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. तसेच त्यांच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी एखनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या कुटुंबाला प्राथमिक मदत म्हणून शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपये देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी बाजीराव चव्हाण यांनी ही मदत रुईकर कुटुंबाकडे सुपुर्द केली. तसेच लवकरच घर देखील बांधून देणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुमंत रुईकर हे त्यांच्या मित्रासह तिरुपती बालाजीला पायी निघाले होते. मात्र रस्त्यातच त्यांना ताप आला. त्यांना ताप आल्याने कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं सुमंत रुईकर यांचं शनिवारी दुपारी निधन झालं. ते त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधार असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. शिवसेनेकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली आहे.