कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी मुंबई : दसरा मेळावा (Dussehra Melava) घेण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेनं मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) आपली बाजू मांडली. दसरा मेळावा हा शिवेसनेचा (Shiv sena News) इतिहास आहे, असंही शिवसेनेनं ठासून सांगण्याचा प्रयत्न कोर्टात केला. यावेळी शिवसेनेच्या वतीने वकील एसपी चिनॉय यांनी मुंबई हायकोर्टात बाजू मांडली. कोरोना काळात शिवाजी पार्क मागितलं नाही, याचा उल्लेखही करायला एसपी चिनॉय विसरले नाही. दरम्यान, यावेळी शिंदे गटाचीही याचिका कोर्टात आहे. त्यावर युक्तिवाद करताना शिवसेनेच्या वकिलांनी मनसेचाही उल्लेख करत टोला लगावला.
उद्या कुणीही वैयक्तिक येऊन शिवाजी पार्कसाठी परवानगी मागेल, तर ते योग्य नाही, असं शिवसेनेच्या वकिलांनी म्हटलंय. दरवर्षी शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. यात मूळ शिवसेना कुणाची हा मुद्दा इथं नाहीये, असंही शिवसेनेचे वकील एसपी चिनॉय यांनी म्हटलंय.
दरम्यान शिवसेनेच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर कोर्टाने सवाल केला. मैदानासाठी कुणीही अर्ज शकतं ना? असा सवाल हायकोर्टाने केल्यानंतर शिवसेना वकिलांनीही होय असं उत्तर दिलं. पण त्यानंतर शिवसेनेच्या वकिलांनी मनसेचा शिवाजी पार्क मागण्याचा मुद्दाही उपस्थित केला.
यापूर्वी मनसेनंही शिवाजी पार्कवर परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला होता, असं शिवसेनेनं म्हटलंय. आम्ही शिवाजी पार्कच्या जागेची आधीच मागणी केलीय. पहिल्यांदा अर्ज हा आम्हीच केला होता, असा दावाही शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. 22 ऑगस्ट आणि 26 ऑगस्टला आम्ही अर्ज केला होता, असं शिवसेनेच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. तर 30 ऑगस्टला शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज केल्याचंही शिवसेनेचे वकील एसपी चिनॉय यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.
2016 साली कोर्टाने मनसेला परवानगी नाकारली होती. त्यावरही कोर्टाने शिवसेनेच्या वकिलांना प्रतिप्रश्न केला. 2016च्या आदेशाने अन्य कुणी परवानगी मागू नये, असं म्हटलंय का? असा सवाल कोर्टाने विचारला. त्यावर तसं काही म्हटलेलं नाही, असं शिवसेनेच्या वकिलांनी नमूद केलं. पण या सोबतच त्यांनी शिंदे गटाची मागणी फेटाळून लावा, अशी मागणीदेखील हायकोर्टात केली.
1966 पासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतोय. पण कोरोना महामारीमुळे गेली 2 वर्ष शिवसेनेनं दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणं टाळलं होतं. आता कोरोना महामारीचं संकट काहीसं टळलंय. त्यामुळे मोठ्या थाटामाटात यंदा शिवसेना दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत होती. पण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामुळे आता शिवाजी पार्कसाठीही शिवसेनेला न्यायालयीन लढा लढण्याची वेळ ओढावलीय.