मालेगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. यानंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा गट असं चित्र निर्माण झालं आहे. या फुटीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन (CM) पायउतार व्हावं लागलं. या सत्तांतर नाट्यानंतर आता शिवसेना अॅक्शन मोडवर आली असून शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदार सुहास कांदे यांना नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुखपदावरून हटवण्यात आल्याची माहिती आहे. कांदे यांच्याजागी मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ग्रामिण जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आहे. यामुळे नाशिकमधली ही मोठी घडामोड मानली जातेय. तर शिवसेनाचा कांदे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. याची जिल्हाभरात चर्चा देखील आहे.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. धात्रक हे गेल्या 26 वर्षांपासून मनमाड पालिकेत नगरसेवक कार्यरत आहे. त्यांनी दोनवेळा नगराध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांच्यावर बंडखोर माजी मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य, तसेच आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदार संघासह मालेगाव मध्य मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे हा दादा भुसे आणि सुहास कांदे यांना मोठा धक्का मानला जातोय. धात्रक यांचा दांडगा जनसंपर्क असून बंडखोर आमदार दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या मतदार संघात शिवसेना पक्ष संघटना वाढविण्याचे आव्हान धात्रक यांच्यासमोर आहे. आगामी काळात एकनिष्ठ शिवसैनिकांची मोट बांधून पक्ष संघटना वाढविण्याचा मनोदय नवनियुक्त ग्रामिण जिल्हाप्रमुख धात्रक यांनी बोलून दाखविला.
यापूर्वी देखील शिवसेनेनं धडक कारवाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात असणाऱ्यांना शिवसेनेकडून काढण्यात आलंय. यामध्ये बड्या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. ठाण्यात देखील असंच चित्र पहायला मिळालं. ठाण्यातील माजी महापौर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्या महापौरांनी शिंदे गटाच्या रॅलीत सहभाग घेतल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती होती. तसाच प्रकार नाशिकमध्ये झाल्याचंही बोललं जातंय. सुहास कांदे यांच्या आणि दादा भुसे यांच्या मतदारसंघात आता शिवसेनेनं नवी नियुक्ती केली आहे.