मुंबई : कधी राजीनाम्यांचे इशारे, तर स्वबळाचा नारा, असे करत करत शिवसेनेने राज्यात आणि केंद्रात भाजपसोबत सत्ता उपभोगल्यानंतर, दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येत लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्याची शक्यता वाढली आहे. किंबहुना, शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युलाही तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केवळ एका जागेवर शिवेसना अडून बसली आहे.
लोकसभेसाठी शिवसेना-भाजपमधील 22-26 चा जागावाटपांचा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्याने, 25-23 च्या नवा फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु झाली आहे. मात्र, शिवसेना भिवंडी आणि पालघरच्या जागेवर अडून बसली आहे. त्यात पालघरची जागा देण्यास भाजप तयार नाहीय. मात्र, सेनेची पहिली पसंती पालघरच्या जागेला आहे. सध्या पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित हे लोकसभेचे खासदार आहेत. एकंदरीत, शिवसेनाला एक जागा वाढवून दिल्यास युतीवरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
खरंतर शिवसेनेने वर्षभरापूर्वी मेळाव्यातून आगामी सर्व निवडणुकी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवेसनेचे मंत्री असो, आमदार असो वा खासदार असो, अन्य पदाधिकारी असो किंवा दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने भाजपवर निशाणा साधला आहे. प्रसंगी विरोधकांच्या खांद्याला खादा लावून उभे राहिले.
भाजपला प्रत्येक गोष्टीत विरोध करणे, हे शिवसेनेचे गेल्या काही महिन्यांमधील धोरण राहिले आहे. सत्तेत राहून सत्तेविरोधात बोलत असल्याने विरोधकांनीही शिवसेनेवर आतापर्यंत प्रचंड टीका केली. मात्र, तरीही शिवसेना सत्तेतून बाहेर पडली नाही. सोबत स्वबळाचा नारा आणि सत्तेविरोधात बोलणं सुरुच ठेवलं. आता युतीची शक्यता निर्माण झाल्याने, शिवसेनेच्या प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.