मुंबई : भाजप प्रणित एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तशी घोषणा केलीय. दरम्यान, आमचा पाठिंबा द्रौपदी मुर्मु यांना आहे, भाजपला नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याबाबत आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विचारलं. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. त्या आदिवासी महिला आहेत. यांना पाठिंबा दिलेल्यांचं स्वागत आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांची भूमिका हिच होती. आम्ही 50 लोकांनी तर आधीच पाठिंबा दिला होता. आता ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचं स्वागत सगळ्यांनीच केलेलं आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच काम पंतप्रधान मोदींनी केलंय. त्यांच्या भूमिकेचं स्वागत सर्वांनीच केलं आहे. आमचे दीपक केसरकर आज एनडीएच्या बैठकीला दिल्लीला गेले आहेत. त्यांना या बैठकीला बोलावलं होतं’.
शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही जी भूमिका घेतली आहे त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय. आज उल्हासनगरचे 18 नगरसेवक आज इथे आले आहेत. नाशिक, दिंडोरी, नगर, राज्यभरातील नगरसेवक आणि लोक आमच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. आमच्या भूमिकेचं स्वागत तिथेही सर्व नागरिकांनी केलंय. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेब, दिघेसाहेब यांना वंदन केलं. त्यांनी दिलेली शिकवण आम्ही आचरणात आणू. हे सरकार सर्वसामान्य नागरिकाचं आहे. सर्वांना वाटलं पाहिजे हे सरकार आपलं आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी जनतेचा सेवक म्हणूनच काम करणार आहे. या सरकारची वाटचाल ही सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवणारी असेल.
दरम्यान, शरद पवार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विचारलं असता, पवारसाहेब मोठे नेते आहेत. आम्ही त्यांचा नेहमीच आदर करतो. पण आज आमच्यासोबत 50 आमदार आहेत. तसंच अनेक नेते, पदाधिकारी, लोकं आमच्या भूमिकेसोबत आहेत. त्यामुळे आम्हाला बाकी राजकारण करायचं नाही. राज्याचा सर्वांगिण विकास हेच आमचं टार्गेट आहे, असं शिंदेंनी स्पष्ट केलंय.