मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने पुकारलेल्या फटकार मोर्चा दरम्यान शिवसैनिकांनी काही भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याबाबत आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केलीय. या मागणीसाठी भाजपचे आमदार आशिष शेलार आणि मुंबई भाजप अध्यक्ष माहिम पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. (File a case against ShivSainiks for beating BJP workers)
भाजप युवा मोर्चाने पोलिसांना सूचना देऊन आंदोलन केलं होतं. मात्र शिवसैनिकांनी पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यावरुन शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली आहे. ज्यावेळी सोनिया आणि वाड्रा आपले देव होतात. त्यावेळी साठे, तेंडुलकर हे शिवसेनेचे शत्रू होतात, अशी घणाघाती टीका आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलीय. लाथों के भूत बातोंसे नही मानते, यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल, असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिलाय.
पोलिसांनी निष्पक्षपणे काम करावं अशी अपेक्षा आहे. गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन अजून वाढेल, असा इशारा देतानाच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन असं आश्वासित केल्याचं यावेळी आशिष शेलार यांनी सांगितलं. पण आम्हाला अजूनही कारण कळत नाही की राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या पोटात का दुखत आहे. ‘देखो ये दिवानो ऐसा काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो’, असा टोलाही शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय.
मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. मात्र, शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं आणि त्याब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. मात्र, दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनांही काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी शिवसेना आता त्यांच्याविरोधातील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातोय.
शिवसेना भवन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासा. ज्या शिवसैनिकांनी शांततेत मोर्चा काढणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार आशिष शेलार यांनी केलाय. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आशिष शेलार माहिम पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय.
संबंधित बातम्या :
शिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप!
VIDEO: भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम करू; निलेश राणेंचा इशारा
Shivsena BJP Dispute File a case against Shiv Sainiks for beating BJP workers