LIVE UPDATE :
कोल्हापूर : शिवसेना-भाजपचे राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचे मेळावे पार पडल्यानंतर, आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार आहे. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन शिवसेना-भाजपकडून प्रचाराला सुरुवात होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप प्रचाराचा शुभारंभ करत असल्याने या सभेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.
शिवसेना-भाजपची सभा कोल्हापुरातील सर्वात मोठ्या तपोवन मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, सभास्थळी ठिकठिकाणी भव्य स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. कोल्हापूर शहरात सर्वत्र भगवे झेंडे लावले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी युतीची पहिली प्रचारसभा असल्याने जय्यत तयारी केली जात असून, भाजपचे मोठे नेते या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
कोल्हापुरातील तपोवन मैदानात जवळपास 5 लाख लोकांची रेकॉर्डब्रेक सभा होईल, असा दावा महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
कोल्हापुरातील सभेच्या आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतील. त्यानंतर ते सभास्थळी येतील.
दुपारी 3 वाजताच सभेला सुरुवात होईल. सुरुवातील सांस्कृतिक कार्यक्रम होतील. त्यानंतर 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान शिवेसना-भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची भाषणं होतील. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभास्थळी येतील आणि त्यानंतर या दोन्ही नेत्यांची भाषणं होतील.
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.