मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भाजपच्या हस्तकांनी या ना त्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या हस्तकांनी मला 22 आमदारांची एकच यादी दाखवली. या आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (shivsena leader sanjay raut addressing pc over ed issue)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला. गेल्या एका वर्षापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार टिकवू देऊ नका. सरकारच्या मोहात पडू नका. आमची सरकार पाडण्याची तयारी झाली आहे, असं मला सांगत असून धमकावलं जात आहे. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, असंही मला धमकावलं जात आहे. पण मी त्यांना बधलो नाही. मीही त्यांचा बाप आहे, असं राऊत म्हणाले.
प्रताप सरनाईक टोकन
भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावं होती. ठाकरे परिवाराशी संबंधितांचीही नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जाईल आणि सरकार पाडलं जाणार असल्याचं मला सांगण्यात आलं. प्रताप सरनाईक हे त्याचं टोकून असून आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, आमची तयारी झाली आहे, असं या हस्तकांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. पण सरकार पाडण्यात हे हस्तक अपयशी ठरले आहेत. कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. म्हणूनच सरकारचे खंदे समर्थक आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना त्रास देण्याचं काम ईडी मार्फत केलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
भाजपचे तीन नेते ईडी कार्यालयात
माझ्या माहितीप्रमाणे ईडीच्या कार्यालयात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. पण भाजपचे तीन लोक सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्रं घेऊन येत आहेत. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. त्याशिवाय मी बोलत नाही, असा दावाही त्यांनी केला.
मी तोंड उघडलं तर हादरे बसतील
यावेळी राऊत यांनी थेट केंद्र सरकारलाच इशारा दिला. मला तोंड उघडायला लावू नका. मी तोंड उघडलं तर केंद्राच्या सत्तेला हादरे बसतील, असा इशारा त्यांनी दिला. तुमचे उद्योग, तुमच्या मुलाबाळांचे हिशोब माझ्याकडे आहेत. पण कुटुंबापर्यंत जाण्याची आमची संस्कृती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुणाच्या कुटुंबापर्यंत न जाण्याचा सल्ला दिला आहे, असं सांगतानाच तुम्ही बायका-पोरांना यात आणत असाल तर तुमचं वस्त्रहरण करावंच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारचा बालही बाका होणार नाही
हे सरकार पाडण्याची डेडलाईन नोव्हेंबरची होती. ही डेडलाईन निघून गेली. त्यामुळे सरकारच्या खंद्या समर्थकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही नोटीस पाठवा अथवा अटक करा, या सरकारचा बालही बाका होणार नाही, असं ते म्हणाले. बायकांच्या पदराआडून राजकारण करण्याची तुमची खेळी तुमच्यावरच उलटल्या शिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.
१० वर्षांपूर्वी कर्ज घेतलं
माझ्या पत्नीने तिच्या मैत्रीणीच्या मदतीने घर घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी 50 लाखांचं कर्ज घेतलं होतं. हे दहा वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे. त्यासाठी नोटीस आलीय. दहा वर्षानंतर ईडीला जाग आली आहे, असंही ते म्हणाले. (shivsena leader sanjay raut addressing pc over ed issue)
दीड महिन्यांपासून पत्रव्यवहार
गेल्या दीड महिन्यांपासून ईडीने आमच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना काही कागदपत्रं हवी होती. आम्ही वेळोवेळी ही कागदपत्रं दिली आहेत, असं सांगतानाच ईडीने चौकशीचा संदर्भ नोटीशीत दिला नाही. मग पीएमसी बँकेचा विषय आला कुठून? भाजपची माकडं पीएमसी बँकेचा मुद्दा का लावून धरत आहेत? पीएमसी बँकेप्रकरणी चौकशी होणार असल्याचं यांना कुणी सांगितलं? ईडीने भाजपच्या कार्यालयात त्यांचं कार्यालय थाटलं आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. (shivsena leader sanjay raut addressing pc over ed issue)
भारतीय जनता पार्टीचे माकड कालपासून उड्या मारत आहेत. त्यांना माहिती आहे का Ed च कार्यालय भाजपच्या कार्यालय थाटले आहे का? संजय राऊतhttps://t.co/geObg8OTjv pic.twitter.com/kHn1l76SLE
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
संबंधित बातम्या:
बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊत यांची 10 मोठी विधाने
Sanjay Raut LIVE | आम्ही लॉ मेकर, तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, संजय राऊतांचा हल्लाबोल
23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?
(shivsena leader sanjay raut addressing pc over ed issue)