मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना विनायक राऊत यांच्या तोंडून शिवी निघाली. मुख्यमंत्र्यांवर विनायक राऊत यांनी पातळी सोडून टीका केल्यामुळे आता राजकारण आणखी तापलं आहे. ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकटं पाडायचं, शिवसेना नाव पुसून टाकायचं, या भ#$%*@#^ करणाऱ्या 40 शिवसेना आमदारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, बिंबवण्याचा त्यांचा उद्देश आहे. पण असं सांगणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावंच लागेल’, असं विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणालेत. दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात ते शनिवारी बोलत होते.
किती आले, किती गेले शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली, असंही विनायक राऊत यांनी यावेळी म्हटलंय. 40 आमदार, 12 खासदार गेले तरीही घाबरू नका, असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांना पेटून उठण्यास सांगितलं. बंडखोरांविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्यासाठीही सज्ज राहण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
दुसरीकडे वेदांतला गुजरातमध्ये पाठवण्याचे काम शिंदे सरकार यांनी केल्याचा आरोप पुन्हा एकदा विनायक राऊत यांनीकेलाय. विशेष म्हणजे विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलंयय. भगवान के पास देर है, लेकिन अंधेर नही है, असा म्हणत विनायक राऊत यांनी फडणवीसांना टोला हाणला. फडणवीसांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागतेय. शिंदेच्या हाताखाली काम करण्याची नामु्ष्की फडणवीसांना आल्याची टीका राऊतांनी यावेळी केली.
गद्दारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे काम मागाठाणे येथून केले जाणार आहे, असा विश्वास शिवसेना नेते विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी नारायण राणे, मोहित कंबोज यांच्यावरही टीका केली. गद्दारांना गाडण्याचा दिवस आला आहे, असं म्हणत विनायक राऊतांनी हल्लाबोल केलाय. यावेळी शिवराळ भाषेत केलेल्या टीकेमुळे विनायक राऊत चर्चेत आलेत.