दादरा नगर-हवेली: शिवसेना आणि भाजप यांच्यातील लढाईमुळे दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रंगतदार होताना दिसत आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना नेत्यांनी हजेरी लावली. शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी सिल्वासा येथे कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
कालच याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली होती. हाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, काल इथे महाराष्ट्रातून कोणी येऊन गेले. त्यांनी गाजर वाटप केले असेल. ते महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी इथे एवढे कोटी दिले, तितके कोटी दिले, असे सांगत फिरत असल्याचा टोला आदित्य यांनी लगावला. त्यामुळे आता भाजपच्या गोटातून आदित्य ठाकरे यांना काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आम्ही इथे पक्ष वाढवण्यासाठी नाही आलो, आम्ही गोव्यात गेलो राजस्थानमध्ये गेलो परंतु ही लढाई न्याय हक्कासाठी आहे. डेलकर कुटुंब असेल, दादरा, नगर-हवेली असेल यांच्यासाठी आहे. दोन परिवार एकत्र आल्यानंतर जो उत्साह आहे तो मी पाहिला. डेलकर कुटुंबाचे मी इथे काम पाहिले, योगदान पाहिले. आजचा जनतेचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
बदला हा शब्द की योग्य ते मला माहित नाही पण न्याय हक्कासाठी ही लढाई सुरू आहे. मो कलाबेन आणि अभिनव यांच्याशी बोलत होतो त्यांचीही भावना हीच आहे इथे जनतेवर हुकूमशाही सुरू आहे, ती मोडून काढली पाहिजे. शिवसेना नेहमीच हुकूमशाही अन्यायाविरुद्ध लढली आहे. लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी उतरल्याचे आदित्य यांनी सांगितले.
दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीची आदित्य यांची ही प्रचारसभा आणखी एका कारणामुळे विशेष ठरली. याआधी 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रचारसभा झाली होती, जी महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची एकमेव सभा होती. त्यानंतर जवळपास 22 वर्षांनी बाळासाहेबांचा नातू असलेल्या आदित्य यांनी दादरा नगर-हवेलीमध्ये प्रचारसभा घेतली.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी सिल्वासात प्रचारासाठी आले होते. यावेळी शिवसेनेला लक्ष्य केले होते. शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केलाय. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात फडणवीस यांनी केला होता.
संबंधित बातम्या:
‘इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार’, नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा