Shivsena MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात काहीवेळात निर्णय लागणार आहे. सगळ्यांच लक्ष या निकालाकडे लागलं आहे. निकालाला काहीवेळा बाकी असताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खळबळजनक दावा केलाय. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच सगळा निकाल ठरलाय असा दावा वैभव नाईक यांनी केलाय. “मी कामानिमित्त मंत्रालयात आलो होतो, मी हे जबाबदारीने बोलतोय. शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे आमदार मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही अपात्र होणार. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार” असं वैभव नाईक म्हणाले.
“दोन दिवसापूर्वीच निकाल ठरलाय. उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे काही लोकांना आधीपासूनच माहित होतं” असा दावा वैभव नाईक यांनी केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक शिवसेनेचे जायंट किलर ठरले होते. त्यांनी माजी मंत्री आणि कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता.
‘मला नाईलाजाने बोलाव लागतय’
“सुनील प्रभू पक्ष प्रतोद म्हणून वैध ठरले होते. त्यांचा व्हीप पहिल्यादिवसापासून आम्ही मानतोय” असं वैभव नाईक म्हणाले. “हे सर्व वेळकाढूपणाच धोरण होतं. निर्णय त्यांना द्यायचा नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, म्हणून ते निकाल देतायत, आमच्याविरोधात निकाल आहे” असं वैभव नाईक म्हणाले. हे मला नाईलाजाने बोलाव लागतय असं ते म्हणाले.
आजच्या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राच लक्ष लागलं आहे. दुपारी 4 वाजल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचन करणार आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल कोणत्या गटाच्या बाजूने लागणार? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.