“फडणवीसांसह त्यांच्या टोळीकडून रोज वैफल्यग्रस्ततेचे दर्शन, भाजपचा खरा चेहरा उघड”

| Updated on: Jul 06, 2021 | 6:46 AM

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

फडणवीसांसह त्यांच्या टोळीकडून रोज वैफल्यग्रस्ततेचे दर्शन, भाजपचा खरा चेहरा उघड
भास्कर जाधव
Follow us on

मुंबई : विरोधी बाकावरचे सदस्य ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक नव्हते, तर महाविकास आघाडीच्या ऐक्याने हतबल आणि सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी या वैफल्यग्रस्ततेचे दर्शन रोज घडवीत आहे, त्याचाच हा एक पुरावा आहे, अशी खरमरीत टीका भायखळा विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी केली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. यावरुन त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. (Shivsena MLA Yamini Jadhav Comment on suspension of 12 BJP MLAs)

यामिनी जाधव काय म्हणाल्या? 

“जनतेचे प्रश्न मांडताना सभागृहात सदस्य आक्रमक होतात. कधी कधी भावना अनावर होतात आणि सदस्यांकडून अनुचित प्रकार देखील घडतात. ते स्वाभाविकही आहे. मात्र आपल्या मर्यादांचे भान ठेवणे लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वतःच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. त्यापेक्षा अधिक पीठासीन अधिकाऱ्यांची ठेवली पाहिजे. मात्र भाजपच्या सदस्यांनी लोकशाहीच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासातील आजचा दिवस काळाकुट्ट आहे. भाजपचे आमदार वेलपर्यंत गेले. राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाला, कामकाज तहकूब झाले, इथपर्यंत ठीक होते. असे प्रसंग सभागृहात वारंवार घडतात. यापूर्वीही घडले आहेत. असे प्रसंग उद्भवले की पीठासीन अधिकारी आपल्या दालनात दोन्ही बाजूंच्या ज्येष्ठ सदस्यांना घेऊन वातावरण पूर्ववत करतात. चिडलेल्या सदस्यांची समजूत काढतात. हा प्रघात आहे,” असेही त्या म्हणाल्या.

“मात्र भाजपचे आमदार एका टोळीच्या मानसिकतेत होते. त्यांनी झुंडीने पीठासीन अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दिशेने कूच केली. गोंधळ घातला. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी सभागृहात केलेले निवेदन भाजप आमदारांच्या हीन मनोवृत्तीवर झगझगीत प्रकाश टाकते. धक्काबुक्की, आई बहिणीच्या शिव्या, झोंबाझोंबी हे नाक्यावर सुद्धा न घडणारे प्रकार प्रत्यक्ष पीठासीन अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आले, संकेत, प्रथा परंपरा यांना अक्षरशः हरताळ फासण्यात आला,” असेही यामिनी जाधव यांनी सांगितले.

“सत्ता गेल्याचे शल्य असतेच. पण ते कुठे आणि कसे व्यक्त करायचे, याचेही संकेत असतात. गुंडगिरी, टर्रेबाजी हे त्याचे माध्यम नाही. नाक्यावरसुद्धा असे प्रकार खपवून घेतले जात नाहीत. ते विधिमंडळात घडले. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा उघड झाला. विरोधी बाकावरचे सदस्य ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक नव्हते, तर महाविकास आघाडीच्या ऐक्याने हतबल आणि सत्ता गेल्याने वैफल्यग्रस्त झाले. फडणवीस आणि त्यांची टोळी या वैफल्यग्रस्ततेचे दर्शन रोज घडवीत आहे, त्याचाच हा एक पुरावा आहे,” अशी टीकाही यामिनी जाधव यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणासंदर्भातील ठरावावरुन झालेल्या गदारोळानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय. विधानसभा अध्यक्षांसमोरील हौदात उतरुन सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तसंच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलाय. या प्रकारानंतर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.


(Shivsena MLA Yamini Jadhav Comment on suspension of 12 BJP MLAs)

संबंधित बातम्या : 

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय ठाकरे सरकारनं का घेतला? जाणून घ्या राजकीय विश्लेषकांचं मत

राज्यपालांनी 12 रोखले, भास्कर जाधवांनी 12 ‘बाद’ केले, भाजपानं आयती संधी दिली? वाचा सविस्तर