मुंबईः शिवसेना (Shivsena) सोडून गेलेल्या आमदारांनी नक्की कशामुळे पक्ष सोडला, हे पुन्हा एकदा विचार करून सांगा. प्रत्येक जण वेगळं कारण सांगतोय. कुणी अनैसर्गिक युतीमुळे, कुणी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे तर कुणी संजय राऊतांमुळे (sanjay Raut) पक्ष सोडल्याचं कारण सांगतोय. त्यामुळे बंडखोरांनी एकदा बसून ठरवा, नक्की कशामुळे पक्ष सोडला, असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना राऊतांनी हा सल्ला दिलाय. संजय राठोड (sanjay Rathod) यांच्यावरील संकटातून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काय काय केलंय, हे सर्वांना माहिती आहे. तेच संजय राठोड आज असं बोलतायत, याबद्दल संजय राऊतांनी खंत व्यक्त केली. तसेच पैठणचे आमदार संदिपान भूमरेंनी तर २०१९मध्ये सरकार आल्यानंतर मला चक्क लोटांगणच घातलं होतं, याचे पुरावेही मी देऊ शकतो, असा दावा संजय राऊतांनी केलाय.
ज्या हिंदुत्वाच्या नावावर शिंदे गट भाजपासोबत निघाला, त्याच भाजपनी २०१९ मध्ये युती तोडली तेव्हा कुणीच काही बोललं नाही. याच हिंदुत्ववादी पक्षाने शिवसेनेला दिलेला पक्ष फिरवला. आता बाहेर निघालेल्यांपैकी तेव्हा कुणीही काहीच बोललं नाही, मग आताच का यांना हिंदुत्व आठवतंय, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
शिवसेना सोडून गेलेले आमदार बंडखोरी केल्याची वेगवेगळी कारणं देत आहेत. कुणी आदित्य ठाकरे, पक्षातील इतर नेत्यांवर आरोप करत आहेत तर कुणी संजय राऊतांमुळे पक्ष सोडल्याचं सांगत आहेत. निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडल्याचंही अनेकांनी सांगितलं. त्यामुळे माझा या बंडोखोरांना सल्ला आहे. त्यांनी एकत्र बसून पुन्हा एकदा ठरवावं की नक्की पक्ष कशासाठी सोडलाय. पक्ष प्रमुखांनी त्यासाठी यांची एक कार्यशाळाही घ्यावी, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.
एकनाथ शिंदे गटात गेलेल्या बुतांश आमदारांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केलाय. ते शिवसेना संपवायला निघालेत, असंही नेत्यांनी म्हटलंय. यावर संजय राऊत म्हणाले, मी कधीही प्रशासकीय कामात पडत नाही. मंत्रालय, विधानभवन, शासकीय जागा असतील संजय राऊत कधीच दिसणार नाही. मी संघटनात्मक काम करतो. त्यामुळे माझा इतरांना अडथळा होण्याचा प्रश्नच येत नाही. संजय राठोड उद्धव ठाकरेंवर आरोप करतायत. पण त्यांच्यावरच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे होते हे सर्वांनी पाहिले आहे. २०१९ मध्ये सरकार आलं तेव्हा संदिपान भूमरे तर सामनाच्या कार्यालयात येऊन लोंटांगणच घातलं होतं, मग आताच असं काय झालं की ते एकाएकी आरोप करत सुटलेत, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय.