राहुल गांधींपाठोपाठ संजय राऊतांचा भाजपवर मोठा आरोप, म्हणाले…

| Updated on: Jul 03, 2024 | 10:34 AM

"काल राज्यसभेत बोलताना त्यांनी माझा माईक बंद केला", असा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला.

राहुल गांधींपाठोपाठ संजय राऊतांचा भाजपवर मोठा आरोप, म्हणाले...
संजय राऊत
Follow us on

Sanjay Raut Mic Off : “काल राज्यसभेत बोलताना त्यांनी माझा माईक बंद केला”, असा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केला. “मी भाजपने कशाप्रकारे निवडणुका जिंकल्या आणि काही जागा लोकसभेच्या चोरल्या, चोरण्याचा प्रयत्न केला हे सांगत असताना माझा माईक बंद केला”, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर घणाघाती आरोप केले. “काल राज्यसभेत मी भाजपने कशाप्रकारे निवडणुका जिंकल्या आणि काही जागा लोकसभेच्या चोरल्या, चोरण्याचा प्रयत्न केला हे सांगत असताना माझा माईक बंद केला. मला खरं तर त्यावर बोलायचं होतं. तु्म्ही आणीबाणी असं म्हणताय, त्या आणीबाणीचं सत्य मला काल सांगायचं होत, पण ते त्यांना समजल्यावर त्यांनी माझा माईक बंद केला. 50 वर्षांची आणीबाणी तुम्ही विसरायला हवी, भविष्यात पाहायला हवं. भूतकाळाचे मुद्द कुठे उकरत बसता”, असा प्रश्नही संजय राऊतांनी विचारला.

“हा संविधानिक पदाचा अपमान”

त्यापुढे ते म्हणाले, “राहुल गांधी त्यांच्यासमोर लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून बसले होते. त्यांना बहुतेक ते सहन होत नसावं. त्यांचा स्वभाव तसा नाही. त्यांना आता हुकुमशाही एकाधिकारशाही याच्यावर राहुल गांधी यांचा लगाम येणार आहे. जर विरोधी पक्षनेता ज्याला घटनात्मक दर्जा आहे, संविधानिक दर्जा आहे, त्या पदावरील व्यक्ती पंतप्रधान बालबुद्धीवैगरे म्हणत असतील तर तो त्यांचा अपमान नाही, त्या संविधानिक पदाचा अपमान आहे. म्हणून आम्ही संविधान धोक्यात आहे असं म्हणतो.”

हे सुद्धा वाचा

“तुम्ही कुबड्यांवर उभे आहात”

“मोदी कोणत्याही प्रकारचं संविधान घटना नियम पाळायला तयार नाहीत. ज्या बालबुद्धीच्या नेत्याने तुम्हाला लोकसभा निवडणुकीत घाम फोडला. याच बालबुद्धीच्या नेत्याने तुमचं बहुमत गमवायला लावलं. याच बालबुद्धीच्या नेत्याने पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला. याची अस्वस्था आम्ही समजू शकतो. पण संसदेत उभं राहून तुम्ही विरोधी पक्षनेत्याला ज्याच्या मागे 237 खासदारांचं बळ आहे, तुम्ही कुबड्यांवर आहात. त्यांना अशाप्रकारे अपमानित करणं यातून तुमची संस्कृती दिसते. तुम्ही संसदीय लोकशाही, संविधान मानायला तयार नाही. म्हणून आम्ही संविधान धोक्यात आहे, असं वारंवार म्हणतो”, असे संजय राऊतांनी म्हटले.

नीट परीक्षा घोटाळ्याबद्दल बोलताना राहुल गांधींचा माईक बंद?

दरम्यान विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी हे लोकसभेत भाषणासाठी उभे राहिल्यावर त्यांचा माईक बंद केला जातो, असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने होत असतो. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरुन चर्चेची मागणी करत असताना त्यांचा माईक बंद केला गेला, असा आरोप काँग्रेसने केला. कांग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल एक व्हिडीओही पोस्ट केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी माईक बंद केल्याचा आरोप केला आहे.