पुणे : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातल्या विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. खेड-शिरुरच्या सेना कार्यकर्त्यानी त्यांचं सकाळी जोरदार स्वागत केलं. अपेक्षेप्रमाणे राऊतांनीही जोरदार बॅटिंग केली. राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या गडात जाऊन आपली ‘पॉवर’ दाखवली.
शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळचा शिवसेनेचा गड… आढळराव पाटील यांनी तिथूनच खासदारकीची हॅट्रिक केली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चौकार मारण्यापासून त्यांना राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी रोखलं. तसंच विधानसभा निवडणुकीत देखील खेड, जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी धुसफूस आहे. याच पार्श्वभूमीवर राऊतांचा पुणे-शिरुर दौरा महत्त्वाचा आहे. अपेक्षेप्रमाणे राऊतांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीला इशाऱ्यावर इशारे दिले आहेत.
“राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असलं तरी मुख्यमंत्री ज्यांचा मुख्यमंत्री असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) वर आहे. ही आपली पॉवर आहे”, असं म्हणत राऊतांनी सेनेची पॉवर दाखवण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे “शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे, असं म्हणत शिरुर लोकसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी राष्ट्रवादीला डिवचलं. तसंच भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते”, असं म्हणत शिवसेनेचं महत्त्व अधोरेकित केलं.
संजय राऊत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलवलं तसंच शिवसेना नेत्यांच्या मनातली बात खुलेआम बोलून दाखवली. कार्यकर्त्यांनो कामाला लागा, असे आदेश देतानाच शिरुर आणि जुन्नर मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास वाटतो, असं राऊत म्हणाले. एकप्रकारे त्यांनी खा. कोल्हे आणि आमदार अतुलशेठ बेनके यांचा पराभूत करण्याचा मनसुबा बोलून दाखवला.
‘खंजीर खुपसणं म्हटलं की पहिलं नावं यायचं शरद पवारांचं यायचं मात्र आता उद्धव ठाकरेंचं येतं’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं.
“चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. ते म्हणाले आमचे 105 आमदार आहेत, तरी आमचा मुख्यमंत्री नाही.. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत”, असा टोला त्यांनी चंद्रकांतदादांना लगावला. तसंच चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीकेला देखील राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून नाही… पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही.. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही”, असं प्रत्युत्तर राऊतांनी चंद्रकांतदादांना दिलं.
(Shivsena MP Sanjay Raut Taut NCP in Pune Shirur Loksbha Constituency)