मुंबई : शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं!, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांवर तोफ डागली आहे. तिकडे उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं गेलं, यावर आवाज उठविण्याऐवजी मीडिया आर्यन खानच्या पाठीमागे धावला, असा आरोप करत मीडियाच्या वागण्यावर राऊतांनी नाराजी व्यक्त केलीय. उत्तर प्रदेशातल्या घटनेवरुन त्यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडताना पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलंय.
हिंदुस्थान ज्या चार स्तंभांवर टिकून आहे ते स्तंभ भय आणि दहशतीच्या वाळवीने पोखरले गेले आहेत. रोजच देशात अशा घटना घडत आहेत व त्यामुळे लोकशाहीबाबतची चिंता वाढू लागते. उत्तर प्रदेशातील लखमपूर खेरी जिल्ह्यात आंदोलक शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालून त्यांना चिरडून मारण्याचा निर्घृण प्रकार घडला आहे. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमालीचे संवेदनशील तसेच भावनाशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना मानवता आणि गरीबांच्या हक्कांविषयी कळवळा आहे. त्यामुळेच अनेकदा पंतप्रधान मोदी हे जाहीरपणे अश्रू ढाळताना जगाने पाहिले आहे. त्या संवेदनशील मोदी यांनी चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नयेत याचे आश्चर्य वाटते.
कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली आले तर ते मरणारच, त्याविषयी किती दुःख व्यक्त करायचे? पण योगींच्या राज्यात चार शेतकरी गाडीखाली आले व त्यांना ठार केले गेले. चार शेतकऱ्यांच्या हत्येने आंदोलन पेटले. त्यातून हिंसाचार घडला. एकूण आठ जणांना त्यात प्राण गमवावा लागला. याचा धक्का संवेदनशील दिल्लीस बसू नये?
यापेक्षा मोठा धक्का असा की, शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. इतके मोठे मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे. उत्तर प्रदेशात मंत्रीपुत्राने चार शेतकरी चिरडून मारले, यापेक्षा शाहरुख खानच्या पोराचे प्रताप या मंडळींना महत्त्वाचे वाटतात. शाहरुख खानचा मुलगा व त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचे कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे. त्यांच्यावर कायद्याने कठोरात कठोर कारवाई होईलच, पण शाहरुख पुत्राच्या कृत्याचे ढोल बडविताना मीडियाने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्यांवर जणू पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला. लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांच्या हत्यांनी देश हादरला आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशच्या रामभूमीवर चिरडण्यात आले. ज्या भूमीवर शेतकरी दोन वर्षांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत, त्यांचा आक्रोश ऐकायला सरकार तयार नाही. गाझीपूरच्या सीमेवर लोखंडी पिंजरे चारही बाजूंनी उभे करून शेतकऱ्यांना बंदिवान बनवून ठेवले. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. अश्रुधूर, लाठय़ा चालविल्या गेल्या. हरयाणात गोळीबार करण्यात आला आणि तेही कमी पडले तेव्हा त्यांच्यावर भरधाव गाड्या चढवून चिरडून मारले. या बातमीची आग मीडियाच्या छोट्या पडद्यावर आणि वृत्तपत्रांच्या कागदावर पेटलेली दिसली नाही. उलट शेतकऱ्यांना दोष देण्याचे काम सुरु आहे. ‘लखीमपूर खेरी’ने देशाची मान शरमेने खाली गेली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढवून ठार करतो, त्याच वेळी हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे भाजप कार्यकर्त्यांना शेतकरी आंदोलकांना जशास तसे उत्तर द्या, असे सांगून हिंसेसाठी उत्तेजन देतात. एका राज्याचा मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांविरुद्ध हिंसाचारास प्रोत्साहन देत असेल तर तेथील राज्यपालांनी ते शासन बरखास्त करण्याची शिफारस तत्काळ करायला हवी. प. बंगाल, महाराष्ट्रातील राज्यपाल याच पद्धतीने काम करतात. मग त्यांचाच कित्ता हरयाणा, उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी का गिरवू नये?
लखीमपूर खेरीतले वातावरण तापले आहे व त्या जिल्ह्यांच्या सीमा आज योगी सरकारने सील केल्या. प्रियंका गांधी शेतकऱ्यांचे हत्याकांड झाले तेथे जाण्यासाठी निघाल्या, त्यांना योगी सरकारने अटक केली. अटक करताना असभ्य वर्तन केले. खासदार हुड्डा यांना धक्काबुक्की केली. हे काय चालले आहे? अखिलेश यादव यांनाही कोंडून ठेवले आहे. इतका कडेकोट बंदोबस्त करण्यापेक्षा सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य का करीत नाही? त्यांचे म्हणणे का ऐकत नाही? शेतकरी ठार मेला तरी चालेल, पण सरकार एक इंचही मागे हटणार नाही, हा ताठ बाणा स्वकियांविरुद्ध जितका आहे, तितका परकीय आक्रमकांविरुद्ध दिसत नाही!
लखीमपूर खेरीच्या सीमा ज्या पद्धतीने सीलबंद केल्या तेवढा ताठा चीन सीमेवर दाखवला असता तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती. तेथे चिनी सैन्य रोज पुढे येतेय आणि देशात शेतकऱ्यांची आणि राजकीय विरोधकांची नाकाबंदी चालली आहे. अर्थात आता शेतकरी भडकला आहे. राज्याराज्यांत भडके उडत आहेत. राजस्थानात शेतकरी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयालाच घेराव घातला. राजस्थानात काँग्रेसचे सरकार आहे. म्हणजे भाजपशासित राज्यातच शेतकरी आंदोलन करतोय असे नाही. तो सर्वत्रच पेटून उठला आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले तेव्हा त्यांना कोणी रोखले नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. त्यांच्यापर्यंत विरोधकांना, शेतकरी नेत्यांना पोहोचू दिले जात नाही. शेतकऱ्यांना मारायचे व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही? केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता. आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिटा सुरू आहे.
हे ही वाचा :
Lakhimpur Kheri Violence : कुणाचा जीव जात असेल तर जबाबदारी कुणाची? सुप्रीम कोर्टाचा सवाल
Priyanka Gandhi : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी उ. प्रदेश पोलिसांच्या ताब्यात