“ममतादीदींनी ईडी आणि सीबीआयरुपी सुल्तानशाहीवर विजय मिळवला, महाराष्ट्रानेही तोच मार्ग स्वीकारणे गरजेचे”

| Updated on: Jul 01, 2021 | 6:36 AM

कोरोना, आर्थिक संकट, बेरोजगारी, निसर्ग संकटाशी महाराष्ट्र सामना करीत आहेच. त्यात आणखी एक 'ईडी' किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे, असं आजच्या अग्रलेखात म्हटलंय. | Saamana Editorial

ममतादीदींनी ईडी आणि सीबीआयरुपी सुल्तानशाहीवर विजय मिळवला, महाराष्ट्रानेही तोच मार्ग स्वीकारणे गरजेचे
शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले
Follow us on

मुंबई : कोरोना, आर्थिक संकट, बेरोजगारी, निसर्ग संकटाशी महाराष्ट्र सामना करीत आहेच. त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे. ममता बॅनर्जी यांनी या सुल्तानशाहीशी अशाच पद्धतीने लढून विजय मिळविला. महाराष्ट्रानेही तोच मार्ग स्वीकारणे गरजेचे असल्याचं मत आजच्या सामन अग्रलेखात मांडण्यात आलं आहे. (Shivsena Sanjay Raut Saamana Editorial Over ED And CBI Inquiry Maharashtra Leader)

ईडी आणि सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळलंय, त्याचा सामना करायला हवा

महाराष्ट्रातील काही मंत्री, आमदार, सरकारविषयी सहानुभूती ठेवणारे उद्योजक यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून राज्यातील विरोधी पक्षाने हलचल माजविण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. या अशा दबावापुढे सरकार पक्षाने न झुकता प्रतिकार करत राहणे हाच योग्य उपाय आहे.

मागे ‘ईडी’ने भलत्याच प्रकरणी पवार यांना नोटीस बजावली. तेव्हा पवार रस्त्यावर उतरुन ‘ईडी’ कार्यालयाकडे जायला निघाले. महाराष्ट्राचे वातावरण तेव्हा ढवळून निघाले होते. ईडी, सीबीआय किंवा आपले महामहीम राज्यपाल महोदय यांचा वापर करून राज्यातील सरकार अस्थिर होईल हा भ्रमाचा भोपळाच आहे. कोरोना, आर्थिक संकट, बेरोजगारी, निसर्ग संकटाशी महाराष्ट्र सामना करीत आहेच. त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले असे मानून मुकाबला करणे हेच आता योग्य आहे.

विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू होऊ देऊ नये म्हणजे झालं…

पंतप्रधान मोदी यांच्या कानावर मुख्यमंत्र्यांनी हे सर्व नक्कीच घातले असणार. मंगळवारच्या पवार-ठाकरे चर्चेतही लढाईचा आराखडा ठरलाच असेल. श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्राच्या मधोमध नेऊन उभा केला व दुष्मनाशी चौफेर मुकाबला करून अधर्माचा पराभव केला. महाराष्ट्राचे सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागीच उभे आहे. विरोधकांनी स्वतःचा अभिमन्यू हेऊ देऊ नये म्हणजे झाले, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावे लागते

मोदींनी ठाकरे यांना भेटण्यासाठी इतका वैयक्तिक वेळ का दिला, हा प्रश्न त्यांनी मोदींना विचारला तर त्यावर उत्तर आणि औषध दोन्ही मिळेल. पवारही अधूनमधून मोदी यांना भेटत असतात आणि बोलत असतात. पंतप्रधानांशी संवाद ठेवण्यासाठी मधल्या अडत्यांची गरज नाही व महाराष्ट्राने उगाच दिल्लीशी भांडण करण्याचीही गरज नाही. महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावे लागते हा इतिहास आहे.

महाराष्ट्राचे भांडण हे विचारांचे, तत्त्वांचे आणि राष्ट्रासाठी असते

संयुक्त महाराष्ट्र लढ्यात नेहरूंशी भांडण करूनच मुंबई महाराष्ट्रास मिळाली. महाराष्ट्राचे भांडण हे विचारांचे, तत्त्वांचे आणि राष्ट्रासाठी असते. शिवसेना त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करत आहे. महाराष्ट्राला संकटकाळी केंद्राने मदत करायला हवी. मधल्या कोरोना संकट काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना फोन लावून मदत मागितली तेव्हा पंतप्रधानांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे मुख्यमंत्री ठाकरे सांगतात. आता पंतप्रधान महाराष्ट्राला मदत करतात म्हणून राज्य सरकारने वेगळी भूमिका घ्यावी असे येथील विरोधी पक्षाला वाटत असेल तर ते कच्चे आहेत.

(Shivsena Sanjay Raut Saamana Editorial Over ED And CBI Inquiry Maharashtra Leader)

हे ही वाचा :

‘त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार’, मलिकांचा भाजपला इशारा

Breaking : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

‘भाजपमधील काहीजणांचं मानसिक संतुलन बिघडलं, त्यातील एक पडळकर’, अमोल मिटकरींचा पलटवार