ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल एका प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सामना आहे. काही पक्षांसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे प्रत्येक एका मतदारसंघात विजय महत्त्वाचा बनला आहे. पराभव परवडणारा नाहीय. काहीही करुन विजय मिळवणं हेच उद्दिष्ट आहे. प्रचार करताना प्रसंगी भाषेचा स्तर घसरतोय. सध्या दोन्ही बाजूंकडून परस्परांवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. शाब्दीक हल्ले चढवताना प्रसंगी खालच्या पातळीवर टीका केली जातेय.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी मुंबईत एक प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या. “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी गद्दार, गद्दार ओरडत होती. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार” असं त्या म्हणाल्या.
‘दीवार’ सिनेमाचा दाखला का दिला?
त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाचा उल्लेख केला. ‘दीवार’ सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, ‘मेरा बाप चोर हैं’ असं त्यावर लिहिलेलं असतं, तसच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उत्तर दिलय.
‘प्रियंका चतुर्वेदी आम्हाला ते बोलायला लावू नका’
“प्रियंका चतुर्वेदी यांनी डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला ते बोलायला लावू नका. तुम्ही खासदार कशा झाल्यात हे सुद्धा आम्हाला माहीत आहे” असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.