माजी उपमहापौर राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का

| Updated on: Jul 07, 2024 | 2:47 PM

राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला.

माजी उपमहापौर राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का
Follow us on

Raju Shinde Join Shivsena : छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला.

आगामी विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक आहेत. यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिवसंकल्प मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान भाजपच्या उपमहापौर राजू शिंदेंनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसोबत भाजपचे नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, रुपचंद वाघमारे यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

ठाकरे गटात प्रवेश करणारे पदाधिकारी

1) राजू शिंदे (माजी उपमहापौर भाजप) 2) गोकुळ मलके (नगरसेवक भाजप) 3) प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप) 4) अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी) 5) प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष) 6) रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) 7) सय्यद कलीम (जिल्हा परिषद सदस्य शिंदे गट) 8) सतीश पाटील (पंचायत समिती सदस्य भाजप) 9) संभाजी चौधरी (ग्रामपंचायत सदस्य भाजप) 10) वसंत प्रधान (भाजप जिल्हा उपाध्यक्ष) 11) माया पाटील ( ग्रामपंचायत सदस्य) 12) शंकर म्हात्रे (भाजप मंडळ अध्यक्ष) 13) कैलास वाणी 14) प्रवीण कुलकर्णी 15) अभिजित पवार तालुका अध्यक्ष भाजप 16) मयूर चोरडिया, 17) सौरभ शिंदे 18) आकाश पवार

भाजपकडून मनधरणीचे प्रयत्न

भाजप मध्ये राहून आपले प्रश्न सुटत नाहीत अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे आम्ही भाजप सोडणार आहोत. मी महापौर, शहराध्यक्ष होऊ शकलो असतो पण झालो नाही याचा विचार भाजपने करावा, असे राजू शिंदे यांनी म्हटले होते. भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही पाहायला मिळाले. मात्र राजू शिंदेंनी आता या गोष्टीला उशीर झालाय असे वरिष्ठांना सांगितले होते. त्यानंतर आज राजू शिंदे यांनी 6 नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे भाजपला येत्या विधानसभेत मोठा धक्का बसला आहे.