Sanjay Raut : मशिदीत घुसण्याची भाषा करणाऱ्या नितेश राणेंना खासदार संजय राऊत यांचं सणसणीत प्रत्युत्तर

| Updated on: Sep 03, 2024 | 10:43 AM

Sanjay Raut : भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली. त्याला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "भाजपाच्या त्या आमदाराचे वडील आधी शिवसेनेत होते. नंतर काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपात आहेत. आता हिंदुत्ववादी बनले आहेत" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : मशिदीत घुसण्याची भाषा करणाऱ्या नितेश राणेंना खासदार संजय राऊत यांचं सणसणीत प्रत्युत्तर
संजय राऊत
Follow us on

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी काल एक प्रक्षोभक वक्तव्य केलं. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. रामगिरी महाराजांच्या विरोधात बोलाल, तर मशिदीत घुसून चून चून के मारेंगे असा इशारा नितेश राणे यांनी दिला. त्यानंतर मशिदीकडे बघून गोळी झाडल्याचा इशारा केला. त्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना आज पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. प्रक्षोभक भाषण करणाऱ्या भाजपा आमदाराला अटक होत नाही, त्यावर संजय राऊत म्हणाले की, “भाजपाच्या त्या आमदाराचे वडील आधी शिवसेनेत होते. नंतर काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपात आहेत”

“आता हिंदुत्ववादी बनले आहेत. मशिदीत घुसून मारणार बोलतात. माझं मोदींना आवाहन आहे, अशा प्रकारची भाषा तुम्हाला मंजूर आहे का? मंजूर असेल, तर परदेशात जाऊन मशिदीत जाणं बंद करा. दुबई, सौदी अरेबिया आणि मलेशिया या इस्लामिक देशात जाऊन मोठमोठ्या नेत्यांची गळाभेट घेता, तिथे मशिदीत जाऊन धर्मनिरपेक्षतेचे धडे देता, हे ढोगं बंद करा” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘आधी पाकिस्तानात घुसा’

“मशिदीत घुसून कोणी मारण्याबद्दल बोलत असेल, तर सरकारने काय केलं पाहिजे?. मशिदीत घुसण्याची भाषा करणाऱ्या त्या आमदाराने आपल्या सरकारला सांगितलं पाहिजे, आधी पाकिस्तानात घुसून दहशतवादाविरुद्ध युद्ध छेडा. जम्मूत आर्मी बेसवर हल्ला झाला. एक जवान शहीद झाला. हे छोटे लोक गावात जाऊन भाषणं करतात. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, राज्यात आग लावायची आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.