मुंबई: शिंदे गटाने शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांना सोडून शिवसेनेच्या 13 आमदारांना व्हीप बजावला आहे. शिंदे गटाकडून बजावण्यात आलेल्या या व्हीपमुळे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) हे प्रचंड संतापले आहेत. हा बेकायदेशीर व्हीप आहे. शिवसेना मूळ पक्ष आहे. त्यामुळे कुणी फुटले असेल, त्यांची संख्या किती असेल तरी शिवसेनेचाच व्हीप लागू होतो. नवे अध्यक्ष बसले आहेत. त्यांनी कायद्याची मोडतोड केली आणि आमच्या लोकांवर कारवाई करण्याचं काम केलं तर त्यांनी आपली वकिलीची सनद सोडून कायदा पाहावा, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी राऊत यांनी विविध राजकीय प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, त्याच वेळी शिवसेनेचाच (shivsena) व्हीप कायदेशीर असल्याचाही दावा त्यांनी केला. हा व्हीप कुणालाही नाकारता येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरेंना सोडून इतरांना का नोटीस दिली याबाबत मला माहीत नाही. जे 14 आमदार आहेत ते बाळासाहेबांचे चेले आणि सैनिक आहेत. हेही लक्षात ठेवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण काही गॅप राहिला असेल. काल तर एक आमदार त्यांच्याकडे गेल्याने आश्चर्य वाटलं. कालपर्यंत तो रडत होता. शिवसैनिकांनी त्यांचं हिंगोलीत स्वागत केलं. तरी गेला, असंही ते म्हणाले. अजूनही बंडखोर आमदार परत येण्याची आम्हाला आशा आहे. कुणाला फसवले असेल, दिशाभूल करून नेले असेल तर येतील. सुबह का भुला शाम को आ जाये तो उसे भुला नही कहते, असंही ते म्हणाले.
काल मी प्रवासात होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं नाही. पण आज ते वाचलं. त्यांच्या भाषणात काही नवीन नाही. सोडून गेलेला प्रत्येक व्यक्ती असंच बोलत असतो. आपलीच बाजू मांडत असतो. मीच कसा खरा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. नारायण राणे सोडून गेले, तेव्हा विधानसभेत ते असंच बोलले होते. छगन भुजबळ सोडून गेले तेव्हा तेही याच पद्धतीने बोलले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडली असेल तर त्यात काही नवीन नाही, असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 200 आमदार निवडून आणणार असल्याचं सांगितलं. 200 आमदार निवडून आले नाही तर मी गावाला शेती करायला जाईल, असंही शिंदे यांनी जाहीर केलं. त्यावरही राऊत यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्री काल जे बोलले ती त्यांची भाषा नव्हती. 200 आमदार निवडून आणण्याची भाषा दिल्लीची होती, अशा शब्दात शिंदे यांची खिल्ली उडवतानाच शिवसैनिकांमध्ये संताप आहे. जनतेत रोष आहे. त्यामुळे आज निवडणुका झाल्यास शिवसेना 100 हून अधिक जागा जिंकून येईल, असा दावाही त्यांनी केला.